निसर्गाच्या कुशीत दडलेलं ‘सांधण दरी’ हे आश्चर्यच. गेल्या वर्षीपर्यंत मलाही हे आश्चर्य माहीत नव्हतं. पण घरी आलो आणि समोर इडीयट बॉक्सवर एअरटेल फोरजीची जाहिरात लागलेली. इगतपुरी जवळचं हे ठिकाण त्यांनी शूटिंगसाठी निवडलेलं. नेमकं हे काय आहे, हा प्रश्न पडला आणि थोडी माहिती काढली. तेव्हा सांधण दरीची खरी ओळख झाली. आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकीक. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. आपणही इथे जायला हवं. काही मित्र पुढच्याच आठवड्यात या ठिकाणी ट्रेकसाठी जाणार असल्याचं कळलं. आणि मीही इथे जाण्याचं मनात पक्कं केलं.

शुक्रवारी रात्री ठरल्याप्रमाणे आमची पलटण मुंबईहून निघते. इगतपुरी पर्यंतचा प्रवास ट्रेनने होतो. अनेक जण माझ्यासारखे नवखेच असतात. काहीचा हा पहिलाच ट्रेक असतो. तर काही सांधण दरीच्या प्रेमाखातर पुन्हा एकदा तिच्या भेटीला निघालेले असतात. इथेच आमची एकमेकांशी ओळख झाली. बोलण्यावरून इतकं मात्र कळत होतं की आम्ही सगळेच या सांधण दरीच्या प्रेमात पडलो होतो. आणि कधी एकदा या अद्भुत जागी पोचतोय असं आम्हाला झालेलं. इगतपुरी स्टेशन गाठलं, तेव्हा आमची जीप तिथे वाट पाहत होती.

जीप समारद गावाच्या दिशेने निघाली तेव्हा वर आकाशात इटुकली चंद्रकोर आणि ताऱ्यांनी भरलेलं आभाळ झगमगत होतं. पुढल्या रात्री अमावस्या असल्याने किती आणि कसे फोटो काढता येतील, यावर फोटोग्राफर मित्रांनी चर्चा सुरू केलेली असते. पुढे तास-दीड तासात आम्ही सामरद गावात पोचतो. गावात अंधारच अंधार. आमच्यातील काहींनी स्काय लँर्टन सोबत आणलेले. ते हवेत सोडत आम्ही काही काळ गप्पा केल्या. पण रात्र काही सरत नव्हती. रात्रीच्या पूर्ण काळोखात हातात टॉर्च घेऊन समोरच्या रतनगडावर चढणारी मंडळी नजरेस पडली. ती पाहून ग्रूपमधल्या नवख्या ट्रेकर्सना ट्रेकिंगची ओढ लागते. उद्याचा ट्रेक आपला पहिला ट्रेक असला तरी तो शेवटचा नाही, हे अनेकांनी या वेळी ठरवलेलं. पण, सकाळी ट्रेकसाठी निघायचं तर थोडा आराम हवाच. आणि म्हणूनच पाठ टेकली आणि छान झोप लागली. पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर या सांधण दरीला भेट देण्यासाठी तुम्ही कधीही इथे यावं. मुंबईहून सहज गाठता येणारी ही दरी असली तरी इथे प्रचंड थंडी असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत येणार असाल तर सोबत भरपूर उबदार कपडे हवे.

सकाळी चहाच्या मस्त सुगंधाने जाग आली. खरं तर इथे बेड टी मिळेल असं वाटलं नव्हतं. पण एकाने सकाळी आमच्या आधी उठून त्याचीही व्यवस्था केली होती. चहाचा घोट घेत सगळं सामान आवरलं. घरून आणलेल्या रिकाम्या बाटल्या गावात पाण्याने भरून घेतल्या. हलकी बॅग आता जड झाली होती. पण, हे वजन एका ट्रेकरसाठी काहीच नव्हतं. कारण, सह्याद्री नुसताच ताठ मानेने उभा नसतो, नव्या जुन्या ट्रेकरना तो एक वेगळीच प्रेरणा देत असतो. सकाळी उजाडल्यावर समोर आजोबा पर्वत, रतन गड, हरिश्चंद्र गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असतात. अशा वेळी ही सांधण दरी सर करणं तुम्हाला त्या मानाने सोप्पं वाटतं. आणि सह्याद्रीचं बळ एकवटून तुम्ही सामरद गावातून सांधण दरीमध्ये उतरतात.

सामरद गावातला खेटूनच सांधण दरी असल्याने दरी पर्यंत पोचण्यासाठी काही वेगळा प्रवास करावा लागत नाही. दरीमध्ये उतरणं सहज सोपं आहे. पावसाळा सरला तरी काही महिने या दरीच्या सुरुवातीच्या काही भागात पाणी साठलेलं असतं. त्यामुळे बॅगा डोक्यावर घेऊन, गुढघाभर पाण्यातून अनेकदा तुम्हाला थोडा प्रवास करावा लागतो. लहानगं कोणी सोबत असेल तर त्याला खांद्यावर घ्यावं लागतं. पण हे अवघ्या काही मिनिटांसाठीच. मुंबईतल्या पावसाळ्याला कंटाळलेल्या एखाद्याला आपण इथे का आलो, असा प्रश्नही पडेल. पण, पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणं घेत जाणारी ही दरी तुम्हाला मोहात पाडते. ही वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. आणि या वाटेवरून तुमचा ट्रेक सुरू असतो.

दरीच्या टोकाला येऊन पोचता तेव्हा तुम्हाला कळतं की सुर्यनारायण डोक्यावर येऊन पोचला आहे. एव्हाना पोटात कावळे ओरडायलाही सुरू झालेले असतात, मग घरून आणलेला सुका खाऊ, लोणचं पराठे, गूळपोळ्या, खजूर बाहेर बॅगेतून निघालायला सुरुवात होते. थोडं पोट भरल्यावर, थोडा आराम करून तुम्ही पुन्हा चालण्यासाठी तुम्ही सज्ज होतात. पण इथून पुढची वाट पूर्वी इतकी सोपी राहत नाही. सांधण दरीची खडतरता तुम्हाला जाणवू लागते. तरीही तुम्ही चालत राहतात आणि तुमच्या सोबत आलेले इतर ग्रुपही तुम्हाला पुढे बसलेले दिसतात. नेमकं काय चालू आहे तिथे, हे सगळे इथे असे बसून का आहेत, हा प्रश्न तुम्हाला पडतो. आणि तुमच्या नजरेला पडतं हे सह्याद्रीचं आणखी एक रूप.

वाट साधी सरळ असेल, तर त्यात मजा काय? आता पर्यंत खडकाळ सांधण दरीमध्ये तुम्ही चालत असतात. तुमच्या दोन्ही बाजूला साधारण तीनशे फुट उंच भिंत असते. या नागमोडी वळणांतून तुमचा उत्तम ट्रेक सुरू असतो. कशी तयार झाली असेल ही दरी ? हा आकलनाच्या पलीकडला प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि अचानक तुम्हाला कळतं की इथून पुढचा प्रवास करायचा तर रोप लावून रॅपलिंग करूनच खाली उतरता येईल. सुमारे ७५ फूट उंचीचा हा पॅच पार करायचं आहे, हे लक्षात आल्यावर अनेकांना धडकी बसते. पण एक एक जण सहज खाली उतरत जातो. आणि ही भीती कमी होत जाते. आपणही हे करू शकतो हा आत्मविश्वास तुमच्यात येतो. हेल्मेट घालून हार्नेस घालून तुम्ही तयार असतात. तुम्हाला दोरखंडांनी बांधले जाते. तुम्ही पुन्हा एकदा सगळं नीट आहे का, हे तपासून बघतात. हात मोजे घालून उतरण्यासाठी सज्ज होतात. गाईड तुम्हाला काही टिप्स देतो. तुम्ही त्या नीट ऐकता आणि तुम्हालाही विश्वास बसणार नाही इतक्या सहज तुम्ही सरसर खाली उतरतात.

कदाचित तुम्ही हे पहिल्यांदाच करत असतात. पण खाली आल्यावर तुमच्यात एक वेगळीच वीरश्री अवतरली असते. तुम्ही तुमच्या मागून येणार्‍याला प्रोत्साहन देत असतात. आपण पुन्हा कधी हे करायचं, कुठे करायचं, याचा विचार करत असतात. पण, सांधण दरीचा हा ट्रेक इथेच संपत नाही. पुढेही तुम्हाला चालायचं असतं. पुढेही ३० फुट आणि ३५ फुटांचे दोन पॅच तुमची वाट बघत असतात. पण तुम्ही ते अगदी सहज पार करतात. थोड्या वेळाने दरीत थोडा काळोख होऊ लागला की बॅगेतल्या टॉर्च हातात घेऊन तुमचा प्रवास सुरू होतो. तो काही वेळासाठीच. पुढे मुक्कामाच्या जागी पोचताच तंबू बांधले जातात. पाठीवरच्या बॅगा दूर सारून तुम्ही मोकळे होतात. आणि तयारी सुरू होते जेवणाची.

तुम्ही थोडी विश्रांती घेईपर्यंत चूल लागलेली असते. जेवण तयार होतंय हे सांगण्याची तुम्हाला गरज नसते कारण जेवणाचा खमंग वास सर्वत्र पसरलेला असतो. चुलीत भाजलेले बटाटे तुम्ही मस्त मीठ लावून स्टार्टर म्हणून खातात. तुम्ही घरी कितीही पंचपक्वान खात असाल, इथली चुलीवरची पिठलं-भाकरी, मिरचीचा ठेचा, भात, लोणचं याची चव त्याला येणं शक्य नाही. जेवणावर आडवा हात मारून नंतर विश्रांती घ्यायची ठरवलेली असते. पण सांधण दरीतली रात्र वेगळीच चमत्कारी असते. अमावस्येची ही चांदण्यांनी भरलेली रात्र तुम्हाला मोहून टाकणारी असते. इथल्या थंडगार वातावरणात तुम्ही आकाशाकडे बघत कितीही वेळ पडून राहू शकता. तुमच्या सोबत असलेल्यांपैकी एखाद्याला ग्रह-ताऱ्यांची उत्तम माहिती असेल, तर आकाशदर्शनाचा मस्त अनुभव तुम्हाला घेता येऊ शकतो. मुंबईच्या आकाशात सहज न दिसणारे सप्तर्षी तिथून अगदी स्पष्ट दिसू लागतात. ताऱ्यांनी भरलेलं आकाश बघत बघत कधी झोप लागते हे कित्येकांना कळत नाही. फोटोग्राफर मंडळी मात्र हे ताऱ्यांचं जग टिपण्यात व्यस्त असतात.

सकाळी चहा नाश्ता करून उगवत्या सुर्यनारायणाच्या साक्षीने तुम्ही पुढचा प्रवास सुरू करतात. सांधण दरीच्या पायथ्यापासून काळू नदीच्या बाजूने चालत जाऊन तुम्हाला देहणे गाव गाठायचे असते. अनेकांना या नदीत डुबण्याचा मोह आवारात नाही. मनसोक्त डुबून झाल्यावर तुम्ही थोडं चालून देहणे गाव गाठतात. दुपारचं जेवण करून होईपर्यंत तुमची जीप तुम्हाला आसनगाव स्टेशनला घेऊन जाण्यासाठी बाहेर उभीच असते. दोन दिवसांचा आमचा ट्रेक संपतो.

सांधण दरीमध्ये वर्षभर अनेक साहसी उपक्रम होत असतात. अनेक मंडळी इथे रॅपलिंग करतच या दरीमध्ये उतरतात. पुढे जागोजागी रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, फ्लायिंग फॉक्स, जायंट स्विंग असे साहसी प्रकार सुरू असतात. अर्थात, हे सगळे साहसी प्रकार तज्‍ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच होतात. ट्रेक जरी संपला असला तरी हे प्रकार करण्याची ओढ तुम्हाला लागलेली असते. आजूबाजूला पाहिलेले किल्ले, गप्पांमध्ये ऐकलेल्या तिथल्या गमती जमती तुम्हालाही अनुभवायच्या असतात. आणि कदाचित तुमचा हा पहिलाच ट्रेक असतो. पण, तुम्ही पुन्हा एकदा ट्रेक करण्यासाठी सज्ज असतात.

आज मी भेट दिली अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सांधण दरीला. पण, हा प्रवास काही इथेच संपलेला नाही. इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.
खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.

कुठे?

कधी जावं?

पावसाळ्याचे चार महिने सोडता इतर आठही महिने तुम्ही इथे ट्रेकिंग साठी जाऊ शकता.

काय काय करता येईल?

ट्रेकिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, फ्लायिंग फॉक्स, जायंट स्विंग

अजून कुठे कुठे जाता येईल?

सांधण दरीला आजोबा पर्वत, रतन गड, हरिश्चंद्र गड, अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर यांनी वेढलेलं आहे. दोन पेक्षा अधिक दिवसांचा ट्रेक करायचा असल्यास पुढे तुम्ही या पैकी एखाद्या ठिकाणी जाऊ शकतात.

सांधण दरीचा हा ट्रेक करून आता वर्ष सरलं, पण या आठवणी मात्र आजही मनात ताज्या आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा हा ट्रेक करायचं ठरवलं आहे. तुम्हालाही हा ट्रेक करायचा असेल तर 9004035515 वर संपर्क करा किंवा खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा.