छंद जोपासण्यासाठी लागतं ते सातत्य. पण, ट्रेकिंग हा काही छंद नाही, ट्रेकिंग म्हणजे जिद्द. आयुष्य जेव्हा खडतर वाटेल, तेव्हा ट्रेकिंगला जा, ते सोपं वाटेल. जेव्हा आयुष्यात खूप अडचणी आहेत असं वाटेल, तेव्हा ट्रेकिंगला जा, त्या अडचणी तुम्हाला छोट्या वाटू लागतील. आयुष्यात खूप काही कमवलं आहे, असं वाटेल, तेव्हा ट्रेकिंगला जा, तुम्ही पुन्हा जमिनीवर याल. आणि आयुष्यात आपण प्रत्येक ठिकाणी खूप कमी पडतोय, असं वाटेल, तेव्हा आपल्यातल्या कणखरपणा तुम्हाला इथेच सापडेल. सह्याद्री हा नेहमी प्रत्येक ट्रेकरसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांच्या पाठीशी उभा असतो. त्याच्या हातात छडी नसली, तरी त्याचं सगळे ऐकतात. आणि त्याचं ऐकायलाच हवं. आणि तो साद देतो, तेव्हा त्याचं ऐकून आम्ही घराबाहेर पडतो, ते नव्या प्रवासाला. अशाच एका प्रवासाची ही गोष्ट.

२०१६ च्या पावसाळ्यात राजमाचीला काढलेला माझा फोटो

या कणखर सह्याद्रीने त्याच्या कुशीत काही आश्चर्य दडवून ठेवली आहेत, तिथवर पोचायचं तर तांगडतोड करायची तयारी हवी. अशाच एका ट्रेकसाठी आज मी निघालेलो आहे. कितव्यांदा? माहीत नाही. पण या जागेत काही तरी वेगळीच जादू आहे. कितव्यांदा जात आहात याचा काही हिशेब नसतो. पण, प्रत्येक वेळी हा प्रवास नव्याने सुरू होतो आणि सह्याद्री त्याच्या कुशीतलं हे आश्चर्य नव्याने उलगडत जातो. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा. या ठिकाणी मी इतक्या वेळा गेलो आहे की गावातले सुद्धा आता ओळखू लागले आहेत. सह्याद्रीतलं जणू दुसरं घर. पण न चुकता वर्षातून दोन-तीनदा इथे वारी होतेच. कुठे विचारताय? अरे हो, सांगायला विसरलोच. तर या वेळी मी तुम्हाला घेऊन चाललो आहे, राजमाचीला.

या राजमाचीच्या केवळ मीच नाही, तर अनेक जण प्रेमात आहेत. खरं तर कोणीही कधीही इथे जावं आणि प्रेमात पडावं. पुण्याला जाताना लोणावळा स्टेशन आलं की कोणाला काय आठवेल, हे माहीत नाही. पण, खऱ्या ट्रेकरची ओळख तुम्हाला इथेच होईल. कारण, त्याच्या तोंडी तुम्हाला ‘राजमाची’ हा शब्द नक्की ऐकायला मिळेल. ट्रेकर्सची पंढरीच म्हणा ना. जो इथे गेला नाही, तो ट्रेकरच नाही. किंवा इथे पाऊल पडलं नाही, तोवर ट्रेकर असल्यासारखं वाटतच नाही अनेकांना. म्हणूनच कदाचित तुम्हाला आज राजमाचीला न्यायचं मी ठरवलं आहे. अनेक जण पहिला ट्रेक म्हणून आजही राजमाचीला पसंती देतात. का? कळेल हळूहळू. या ट्रेकला तुम्ही एकदा तरी जा, तुम्ही या ट्रेकच्या प्रेमात पडाल हे मात्र नक्की.

किल्ले श्रीवर्धनवर घालवलेली निवांत वेळ

अशा या ट्रेकला जायचं तर ट्रेनने लोणावळ्याला उतरावं लागतं. हो, मला माहीत आहे की अजून अनेक ठिकाणांहून इथे पोचता येतं. पण, राजमाचीला जायचं तर लोणावळ्यावरूनच. रात्री उशिराची साईनगर शिर्डी ट्रेन पकडायची आणि निघायचं. तीन – साडे तीनच्या सुमारास तुम्ही लोणावळा स्टेशन गाठतात. इतक्या रात्री तुमच्या शिवाय तिथे कोणीच नसतं. स्टेशनवरच तोंडावर थोडं पाणी मारून घ्यायचं आणि आलेली झोप तिथेच सोडून पुढे निघायचं. स्टेशन मधून बाहेर पडून सरळ चालत गेलात की पाच-एक मिनिटांवर लोणावळा बस डेपो लागतो. लोणावळ्यात इतक्या रात्री चहा आणि वडा पाव मिळण्याचं सगळ्यात उत्तम ठिकाण हेच. पोटोबा प्रसन्न तर ट्रेक पचास, असं म्हणून भूक आहे तेव्हडं इथेच चरून घ्यायचं. कारण इथून राजमाचीला पोचायला निदान पाच ते सहा तास लागतात. महत्त्वाचं म्हणजे वाटेत कुठेही खायला मिळत नाही. सहा तासांसाठी लागणारं पाणी सुद्धा तुम्हाला इथेच भरून घ्यायचं आहे. पोटापाण्याची सोय होईपर्यंत चार कधी वाजतात ते तुम्हाला कळत नाही. आणि तुम्ही पुढच्या ट्रेकसाठी सज्ज झालेले असता.

राजमाची आणि पावसाळा हे उत्तम समीकरण.

लोणावळा बस डेपो सोडताच सगळ्यांच्या बॅगेतून टॉर्च बाहेर येतात. पाच ते दहा मिनिटांचं अंतर कापत तुम्ही हायवेला येऊन पोचता. इथून राजमाची १८ ते १९ किमी अंतरावर. पण वाट सहज समजणारी. हायवेला पोचताच डाव्या हाताला तुम्हाला भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप नजरेस पडतो. या पेट्रोल पंपाच्या बाजूच्या गल्लीमध्ये तुम्हाला जायचं आहे. एकदा या गल्लीमध्ये तुम्ही शिरलात की तुमचं टेन्शन संपलं. तुम्हाला सरळ रस्ता नेईल तिथवर चालत जायचं आहे.

२०१६ची गोष्ट. मी, साई आणि हृषी राजमाचीला निघालो होतो. या रस्त्याला लागतो, तेव्हा प्रचंड पाऊस होता. रात्री निघालो आहोत. पण हा पाऊस थांबायचं काही नाव घेईना. तेव्हा थोडं थांबून सकाळी निघायचं का? हा प्रश्न आमच्या डोक्यात आला. एका मंदिराचा आडोसा घेऊन आम्ही थोडा वेळ थांबलो. हवामान खातं काय म्हणतं, हे बघूया म्हटलं. पुढचे चोवीस तास तरी हा पाऊस थांबणार नव्हता. तेव्हा आम्ही आमचं बिऱ्हाड बांधलं. आणि पुढचा रस्ता पकडला. राजमाचीला जायचं तर हवामान खातं नाही, तर तुमची जिद्द तपासून घ्यायची हे आम्ही तेव्हा शिकलो. कारण इथला पाऊस कधीच थांबणारा नसतो.

राजमाचीला कधीही जावं, पण तुम्ही पावसाळा निवडला असेल. तर हा रस्ता म्हणजे तुमच्यासाठी स्वर्ग असतो. लोणावळा सोडून तुम्ही तुंगार्ली धरणापाशी येता, तेव्हा धुकं वगळता तुम्हाला काहीही दिसत नसतं. अंगावर कोसळणाऱ्या पावसाने तुमच्या अंगावरची एकही जागा कोरडी सोडलेली नसते. पण, तुम्हाला त्याची चिंता नसते. तुम्ही राजमाचीच्या वारीला निघालेले असता. कितव्यांदा? देव जाणे. पावसाचे टपोरे थेंब तुमच्या अंगावर कोसळत असतात. असंख्य सुया एका वेळी टोचाव्यात तसे. पण, एकमेकांकडे बघत, त्यांच्या कुडकुडणाऱ्या चेहऱ्याकडे बघून हसत, थरथरणाऱ्या हातात हात देत तुम्ही पुढे जायचं ठरवता.

२०१७च्या पावसाळ्यात किल्ले मनरंजन चढताना

थोडं पुढे गेलात की हा स्वर्ग तुमचाच असतो. पहाटेच्या वेळी तुमच्या शिवाय इथे कोणीच नसतं. एका बाजूला दरी, तर दुसऱ्या बाजूला एका मागोमाग एक छोटेखानी धबधबे वाहत असतात. आधी तुम्ही तुमचा मोह आवरता घेतात. तुम्हाला राजमाचीला शक्य तितक्या लवकर पोचायचं आहे, हे एकमेकांना सांगतात. पण, साधारण दोन तीन धबधबे गेल्यावर चवथ्या धबधब्याला मात्र तुम्ही ‘इथे थांबूया’, असं स्वतःहून सगळ्यांना सांगतात. इथे एका बाजूला एक असे अनेक धबधबे वाहत असतात. तुमच्या देहावरून वाहणारं थंड पाणी तुम्ही कापलेलं अंतर शून्य आहे आणि उरलेलं अंतर शून्य आहे, हे तुमच्या कानी सांगून जात असतं. त्याला ‘खरं आहे’ असं म्हणत तुम्ही उठता आणि पुढे जायचं ठरवता. हे झालं पावसाळ्याचं. थंडीमध्ये मात्र तुम्हाला धुक्यातून वाट काढण्याशिवाय दुसरं काम नसतं. तर उन्हाळ्याच्या शेवटच्या आठवड्यात इथून जात असताना निसर्ग तुम्हाला प्रत्येक पाऊलावर स्वर्गात असल्याची जाणीव करून देत असतो. मुंबईपेक्षा कित्येक पटीने इथलं वातावरण थंड असतं. शिवाय, आजूबाजूच्या झाडांवर, रस्त्यावर इवलाले काजवे तुमची वाट अडवून बसलेले असतात. शेकडोच्या संख्येने चमकणारे हे काजवे पाहून तुमचा पाय पुढे जात नसतो. मग, ग्रुप मधलं कोणी तरी ‘राजमाचीला जायचं आहे ना?’ हा प्रश्न विचारून तुम्हाला भानावर आणतो. आणि तुम्ही मोह आवरून पुढे चालू लागतात.

या सगळ्या गोष्टींमुळे तुमची वाट तोकडी होत जाते आणि तुम्ही हे अंतर वेगाने कापत पुढे जात असतात. सकाळ होते तेव्हा तुम्ही सूर्यनारायणाचं दर्शन घेऊन पुढे सरकत राहता आणि थोड्या वेळाने तुमची पावलं जड होऊ लागतात. रात्री केलेली सगळी धमाल एका बाजूला असते आणि दुसर्‍या बाजूला जड झालेली पावलं असतात. पण, लोणावळा खूप दूर सरलेलं असतं. आणि राजमाची अवघ्या तासाभराच्या अंतरावर तुमची वाट बघत असतं. तुम्ही एका अशा ठिकाणी येऊन पोचता की जिथे रस्त्याला दोन फाटे फुटलेले दिसतात. एक रस्ता ढाक बहिरीला तर एक राजमाचीला जातो. ढाक बहिरीचा खडतर प्रवास पुन्हा कधी तरी करू असं म्हणत तुम्ही राजमाचीच्या दिशेने तुमची स्वारी वळवतात. आता थोडाच वेळ उरलाय असं इतरांना सांगून चालू लागतात.

रात्रीच्या पावसाने तुमचा रस्ता चिखलमय केला असेल, तर त्यातून वाट काढत तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. तर उन्हाळ्यात डोक्यावरचा सूर्य तुमची चालण्याची गती कमी करण्यासाठी पुरेसा असतो. सोबत असलेले ट्रेकर मित्र आणि कोतवाल पक्ष्याची साद इतकंच तुम्हाला ऐकू येत असतं. दूरवर वसलेलं राजमाची तुमच्या डोक्यात घर करून बसलेलं असतं. पण, हे राजमाची काही केल्या तुमच्या नजरेस पडत नसतं. तुम्ही चालत राहतात. कारण, त्या शिवाय तुमच्याकडे कोणता पर्यायच नसतो. खुद्द किल्ल्याच्या पायथ्या जवळ तुम्ही पोचता, तेव्हा कुठे किल्ले मनरंजन आणि किल्ले श्रीवर्धन तुमच्या नजरेस पडतात. तुम्ही मोकळा श्वास घेतात. उधेवाडी (राजमाची) असा फलक तुमचं लक्ष वेधून घेतो आणि तुम्ही न थांबता राजमाचीमध्ये दाखल होता.

मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं, राजमाची म्हणजे डोंगर – दऱ्यांत दडलेलं माझं दुसरं घर. मी येतोय, हे सांगून निघालो, तर उंबरे मामा वाट बघत असतात. मी येताना दिसलो की मामीला हाक देतात आणि ‘पोरांसाठी गरमागरम पोहे बनवायला घे’ अशी ऑर्डर सोडतात. राजमाची आणि मला जोडून ठेवणारं आणखी एक कारण म्हणजे हे उंबरे कुटुंब. राजमाचीला गेलो तर त्यांच्या घरी मी अगदी घरातलाच असल्यासारखा वावरतो. बरं. आणखी एक म्हणजे उंबरे मामी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा. उंबरे मामींनी चुलीवर केलेलं जेवण पोटात गेलं की इथे येण्यासाठी केलेली पायपीट तुम्ही विसरून जाता आणि इथेच राहूया, हा विचार तुमच्या डोक्यात येतो.

थोडी विश्रांती घेऊन तुम्ही राजमाचीमध्ये फेरफटका मारायला निघता. राजमाचीवरचे किल्ले मनरंजन आणि किल्ले श्रीवर्धन हे बाले किल्ले चढाईसाठी अगदी सहज सोपे. या दोन किल्ल्यांच्या मध्यावर एक सुंदर भैरवनाथाचं मंदिर आहे. इथे जाण्यासाठी छानशा पायऱ्या केल्या आहेत. वाटेत गुंफा आणि पाण्याचे टाके सुद्धा आहेत. भैरवनाथाचं दर्शन घेऊन तुम्ही किल्ले मनरंजन चढायला सुरुवात करता. चढाईला सहज सोप्पा असलेला हा किल्ला सर केला की वर जाऊन तुम्ही किल्ल्याचे उरलेले अवशेष न्याहाळत बसता. इथून एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असे किल्ले तुमच्या सहज नजरेत पडतात.

प्रथमेश, अथर्व आणि आदित्य

इतर ट्रेक प्रमाणे तुम्हाला कोणतीही घाई नसते. तुम्ही खूप फोटो काढता आणि ‘हे काय असावं? ते काय असावं?’ अशा प्रश्नांनी तुमचं डोकं खाजवून घेतात. थोड्या वेळाने चिकित्सक बुद्धीला आवर घालून तुम्ही किल्ला उतरायला घेतात. भैरवनाथाचं मंदिर येताच तिथल्या मावशी लिंबू सरबत बनवताना दिसतात. लिंबू सरबत पिऊन, पायांना थोडा आराम देऊन किल्ले श्रीवर्धन चढायला सुरुवात होते. वर पोचायला संध्याकाळचे सहा वाजलेले असतात. पावसाळा सोडला तर इतर वेळी आकाश चांगलं तांबड झालेलं असतं. मावळणाऱ्या सूर्यनारायणाला हात जोडून तुम्ही सांगत असता की उद्याचा परतीचा प्रवास छान होऊ देत. अवघ्या काही मिनिटांत अंधार पडू लागतो. आणि तुम्ही किल्ला उतरायला घेतात.

किल्ले मनरंजनहून दिसणारा सूर्यास्त

पावसाळ्यात हे किल्ले जितके हिरवेगार असतात, उन्हाळ्यात ते तितकेच कोरडे आणि तापलेले असतात. पावसाळ्यात अनेकदा किल्ल्यावर पाणी साचलेलं असतं. वाटेत शेतातले खेकडे तुमची वाट अडवतात. तर उन्हाळ्यात इथलं सुकलेलं गवत तुमच्या नजरेस पडेल. २०१६च्या सुरुवातीला मी, अथर्व, आदित्य आणि प्रथमेश राजमाचीला गेलेलो. तेव्हाची गोष्ट. नवीन वर्षाचं स्वागत भटकंतीने व्हावं म्हणून आम्ही राजमाचीची निवड केलेली. जेव्हा आम्ही राजमाचीला पोचलो, तेव्हा कळलं की आदल्या दिवशी ३१ डिसेंबरच्या मुहूर्तावर मुंबईच्या काही ट्रेकरनी दारू पिऊन किल्ल्यांना आग लावली. गावकऱ्यांनी चोप देत त्यांना लोणावळ्याच्या दिशेने रात्रीच पळवून लावलं. प्रत्यक्षात आम्ही किल्ले बघायला गेलो, तेव्हा जळून काळेकुट्ट पडलेले किल्ले आमच्या नजरेस पडले. तुम्ही मुंबईमध्ये असताना मनाला वाट्टेल ते करा. पण, हात जोडून विनंती आहे की, इथे ट्रेकला याल तेव्हा मात्र असा प्रकार करू नका. आणि असं काही करताना आढळात तर मात्र मिळणारा चोप अटळ आहे.

२०१६ वर्षाची सुरुवात आम्ही राजमाची केलेली

किल्ले पाहून परत उधेवाडी (राजमाची)मध्ये आपण पोचतो तेव्हा अंधार झालेला असतो. आजही या गावात वीज नाही. पण, गावात प्रत्येक घरात सोलार पॅनेल लावलेले आहेत. रात्रीच्या वेळी लागणारा प्रकाश देण्यासाठी ते पुरेसे आहेत. जेवण तयार व्हायला वेळ असतो. तोवर गप्पा रंगतात. इथल्या तिथल्या ट्रेकच्या गमती सांगून झाल्यावर पुढचा कोणता ट्रेक करायचा याचं प्लॅनिंग सुरू होतं. दुसर्‍या दिवशी परतीच्या प्रवासाची माहिती आपण करून घेतो. गप्पा खरं तर रंगात आलेल्या असतात. पण, घरून जेवणाचा खमंग वास तुमच्या नाकपुड्यांपर्यंत पोचलेला असतो. तुम्ही जेवणासाठी सज्ज होतात. पिठलं – भाकरी – मिरचीचा ठेचा – पापड – वरण – भात असा खास बेत तुमच्यासाठी मामींनी केलेला असतो. चुलीवरचं हे जेवण समोर असल्यावर तुम्ही नेहमी पेक्षा थोडं जास्तच जेवतात. तुम्हाला सुस्ती येते. पण, ‘चला, थोडं फिरून येऊ’ असं कोणी तरी म्हणतं. आकाश वाचनाचा छंद असलेला एखादा मित्र सोबत असेल, तर तुम्हाला इथल्या आकाशात चंद्र ताऱ्यांची सफर होते. अनेकदा इथे जाताना मी स्काय लँप घेऊन जातो. रात्री फेरफटका मारायला निघाल्यावर ते आकाशात सोडण्याची मजा काही वेगळीच असते. अनेकदा उनो खेळण्याचा बेत होतो. तर काही वेळा भुताच्या गोष्टीही सुरू होतात. गप्पा मारता मारता कधी झोप लागते, हेच काळात नाही.

राजमाची वरून निघायच्या दिवशी पहाटेचे पाच वाजले की उठायचं. फ्रेश होऊन चहा नाश्ता उरकून घ्यायचा. तोवर उजाडतं. मग, उंबरे मामांना राम राम म्हणत, ‘लवकरच भेटू’ असं सांगत काढता पाय घ्यायचा. उदयसागर तलाव आणि गोधनेश्वर मंदिरही बघायचं आहे, अशा ट्रेकरनी मात्र पहाटे उठूनच ते पाहून घ्यावं. आणि मग परतीचा प्रवास सुरू करावा. येतानाचा प्रवास मोठा असला तरी तो तुलनेने सोपा होता. खरी कस लागते ती परतीच्या प्रवासाला. परतीचा प्रवास आपण लोणावळा गाठण्यासाठी नाही तर कर्जत गाठण्यासाठी करतो. आधीच्या तुलनेत हे अंतर कमी असलं तरी इथे तुमचा एक छानसा ट्रेक होईल. नवख्या ट्रेकर्सना कदाचित ही वाट थोडी खडतर वाटू शकते. पण, राजमाचीचा हा ट्रेक तुम्हाला निराश करणार नाही याची हमी मी तुम्हाला देऊ शकतो.

राजमाचीहून येताना पकडलेले खेकडे

परतीच्या प्रवासातलं हे जंगल तुम्हाला नेहमीच प्रसन्न वाटतं. पावसाळ्यात इथे धो धो पाऊस पडत असतो. मुंबईमध्ये अतिशय महाग वाटणारे खेकडे तुम्हाला पाहून पळत असतात. त्यातले मोठमोठे खेकडे शोधून तुम्ही पिशवीत भरून रात्रीच्या मेजवानीची स्वप्न रंगवत असतात. या वाटेवरून उतरताना समोर लोणावळ्याच्या घाटावरून कडेकडेने हळूहळू घाट चढणारी एक्सप्रेस, आणि समोरचा हिरवागार निसर्ग तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो. पण, तुमचा ट्रेक संपलेला नसतो. वाटेत धबधबे आहेत. तिथे थांबून तुम्ही पाण्यात खेळता. ट्रेक संपायला काही वेळ उरला की वाटेत कोंढाणे लेणी लागते. हजारो वर्षांपासून ही बुद्धिस्ट लेणी म्हणजे या वाटेने जाणाऱ्या लोकांच्या पसंतीचं ठिकाण. इथे थांबून तुम्ही थोडी विश्रांती घेतात.

थोडा वेळ विश्रांती घेत तुम्ही कोंडीवणे / मुंढेवाडीच्या दिशेने चालू लागतात. अर्धा तासात खाली पोचतात, तुमच्या नजरेस उल्हास नदी लागते. त्या नदीवरचा पूल पार केलात की कर्जतला घेऊन जाण्यासाठी टमटम तुमची वाट बघत असते. ट्रेक संपलेला असतो. अंगातली ताकदही. पण ‘राजमाचीला पुन्हा कधी यायचं?’ या न संपणाऱ्या चर्चेला सुरुवात झालेली असते.

राजमाची – कर्जत वाटेवरची कोंडाणे लेणी

आज आपण भेट दिली राजमाचीला. पण, हा प्रवास काही इथेच संपलेला नाही. इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.

खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.

(तुम्हालाही हा ट्रेक करायचा असेल तर 9004035515 वर संपर्क करा किंवा खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा.)