श्रावण आणि मासळी हे एक वेगळं समीकरण. तुम्ही कितीही श्रावण पाळायचं ठरवलं तरी समोर मासळी आली वा आज मासे खायला जायचं का ? असं कोणी विचारलं की तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहणार नाही. त्यात ही मेजवानी अस्सल गोमंतक पद्धतीची मिळणार असेल तर ? नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही. आम्हीही नाही म्हणूच शकलो नाही. आणि थेट येऊन पोचलो ठाण्याच्या नव गोमंतक या रेस्टॉरंटमध्ये.

ठाण्याच्या या नव्या रेस्टॉरंटमध्ये जायचं म्हणून मी खूप उत्सुक होतो. गोमंतक पद्धतीचं जेवण चाखायला मिळणार ही कल्पनाच माझ्यासाठी भन्नाट होती. समोर येतील तितके मासे आपण खाऊ, हा विचार डोक्यात ठेऊनच मी ठाण्याच्या नव गोमंतकच्या दिशेने निघालो. सोबत माझी टीम होतीच. रेस्टॉरंटमध्ये पोचलो तेव्हा रेस्टॉरंट गच्च भरलेलं होतं. इथले पदार्थ चाखता यावे म्हणून काही जण रेस्टॉरंटच्या बाहेरही वाट पाहत होते. पण, नव गोमंतकसाठी ही गर्दी नेहमीचीच.

आज काय खायचं हा विचार करताना

नव गोमंतकमध्ये शिरलो तेव्हा साधारण गोवन चालीची गाणी लागली होती. प्रत्येक टेबलावर गप्पा रंगत होत्या. किती छान झालंय ना ? अरे वाह ! ए पुन्हा कधी यायचं ? पुढच्या वेळी ना आपण ते ट्राय करू ! हे आणि असे काही संवाद कानी पडत होते. त्यामुळे सारं काही विसरून काय ऑर्डर करायची याकडे आमचा मोर्चा वळला. पण, नव गोमंतकमधला मेनू न संपणारा. त्यामुळे आज काय चाखावं ? तुम्हीच सांगा, असं सांगून मी मोकळा झालो. आम्हां चौघांच्या आवडी निवडी समजून घेत मेनू ठरला. पण ते पदार्थ कधी समोर येतील असं झालं होतं. शेवटी न राहवून आम्ही किचनकडे निघालो. ‘आम्हालाही ही मेजवानी कशी तयार होते ते पहायचं आहे’, हे विचारलं तेव्हा आमच्या नशिबाने त्यांनी होकारार्थी माना हलल्या. आणि आम्ही थेट येऊन पोचलो नव गोमंतकच्या किचनमध्ये.

सगळ्यांनी नक्की चाखावी अशी कोथिंबीर वडी 

एकीकडे आमच्यासाठी थाळीचे चार वेगवेगळे प्रकार बनत होतेच. शिवाय प्रत्येकासाठी त्यांच्या आवडीनुसार एक दोन वेगवेगळे पदार्थ बनवण्याची तयारी किचनमध्ये सुरू होती. पापलेट रवा फ्राय, सुरमई तवा फ्राय, तिसऱ्या मसाला, कोलंबी फ्राय नावं ऐकूनच तोंडाला पाणी सुटत होतं. साफ केलेली ही मासळी समोर आली तेव्हा त्यांचं आकारमान हे मोजण्यासारखं होतं. सुरमईची वितभर तुकडी, या भल्या मोठ्या कोलंब्या, प्रत्येक गोष्ट अगदी गोव्यातूनच आणल्याचा भास. आम्ही बघत होतो. वेगवेगळी वाटणं, रवा, वगैरे लावण्याचं त्यांचं काम सुरू होतं. बरं. जे मासळी खात नाहीत, त्यांचं काय ? त्यांच्यासाठी भाज्यांचे काप, कोथिंबीर वडी हे ऑल टाईम फेव्हरेट पदार्थ आहेतच की इथे. तेही बनवण्याचं काम सुरू होतं. हे पदार्थ कसे बनत आहेत, हे थोडा वेळ पाहून आम्ही आमच्या जागेवर येऊन बसलो. आणि थोड्याच वेळात एक एक पदार्थ समोर येऊ लागले.

ही तुकडी माझी, हे मित्रांना सांगताना

कोंबडी वडे थाळी, सुरमई थाळी, व्हेज थाळी, वांग थाळी अशा चार थाळ्या समोर आल्या. प्रत्येक थाळी वेगवेगळ्या पदार्थांनी गच्च भरलेली होती. एखादी थाळी घेतली तरी पुरे, इतकी व्यवस्थितपणे वेगवेगळ्या पदार्थांनी ही थाळी सजवलेली होती. आणि चव ? ती तर विचारूच नका. कारण, ती अजूनही जिभेवर तरळत आहे. पुन्हा कधी हे पदार्थ चाखायचे हे जीभ विचारत आहे. (मुहूर्त त्यांनी पुन्हा बोलावण्याचा.) शिवाय प्रत्येकासाठी एक खास डिश होतीच. इथल्या आम्ही चाखलेल्या पापलेट रवा फ्राय, सुरमई तवा फ्राय, तिसऱ्या मसाला, कोलंबी फ्राय या डिश तुम्ही नक्की चाखून बघायला हव्या. मन तृप्त होईल यात काहीच शंका नाही. कोलंबी फ्राय आणि तिसऱ्या मसाला या तर आता माझ्या फेव्हरेट डिश आहेत असं म्हणायला हरकत नाही. ती चव इतर कोणत्या रेस्टॉरंटमध्ये चाखायला मिळेल असं वाटत नाही. त्यासाठी नव गोमंतकमध्येच जायला हवं. तुम्ही मासळी खायला गेला असाल तरी इथली कोथिंबीर वडी चाखून बघायला हरकत नाही. इथलं शाकाहारी जेवणही तितकंच उत्तम आहे. तुम्ही इतर कोणतीही डिश मागवा. तुमच्या सोबत आलेल्या एखाद्याने कोथिंबीर वडी मागवली असेल, तर त्यातून एखादी वडी उचलल्या शिवाय तुम्हाला राहवणार नाही.

कोलंबी फ्राय

बरं. आणखी एक. हे सगळं पचायला हलकं जावं म्हणून सोबत सोलकढी. यासाठी जेवताना किंवा जेवून झाल्यावर पिण्यासाठी सोलकढी शिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही. जेवून झाल्यावर तोंड गोड करायचा विचार आहे तर आईसक्रिमची गरज नाही. इथे तयार केलेल्या खरवसला तोड नाही. सोबत चार जीवाभावाचे मित्र आणि खूप साऱ्या गप्पा असतील तर ही मेजवानी अजून रंगत जाईल.

आज मी भेट दिली ठाण्याच्या नव गोमंतक या रेस्टॉरंटला. पण, हा प्रवास काही इथेच संपलेला नाही. इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.

खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.