तिखट, मसालेदार, झणझणीत, हे आणि असे शब्द कानावर आले की काय आठवतं ? तर कोल्हापूर. तिखट आणि कोल्हापूर हे एक वेगळंच समीकरण. आणि या नवीन वर्षाची सुरुवात असाच एखादा तिखट कोल्हापुरी पदार्थ चाखून करायची होती. म्हणूनच एक अस्सल कोल्हापुरी रेस्टॉरंटच्या शोधात मी होतो. आणि ही शोध मोहीम येऊन थांबली ती ठाण्याच्या ‘एमएच ०९ शेतकरी’ या रेस्टॉरंटमध्ये.

कोल्हापुरी मेजवानी चाखण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी एमएच ०९ शेतकरी मध्ये येऊन पोचलो. हे रेस्टॉरंट म्हणजे एक कोल्हापुरी घरच आहे, असं इथल्या शेफ सुरज संकपाळ यांचं म्हणणं. त्यामुळे कोल्हापुरातल्या शेतकरी घराचं फिलिंग या रेस्टॉरंटमध्ये यावं, म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. कोल्हापुरात शूट झालेली मराठी गाणी लावली होती. कोल्हापूरची माहिती देणारी डॉक्युमेंटरी टीव्हीवर दाखवली जात होती. कोल्हापुरी शब्द आलेल्या लोकांना कळावेत म्हणून कोल्हापुरी शब्द आणि त्यांचे अर्थ अशी यादी प्रत्येक टेबलवर ठेवलेली होती. आणि मीही कोल्हापुरातलाच आहे हे मला वाटावं म्हणून कोल्हापुरातल्या एखाद्या शेतकऱ्याप्रमाणे मलाही डोक्यावर फेटा आणि खांद्यावर घोंगड असा खास कोल्हापुरी शेतकऱ्याचा पोशाख देण्यात आला होता.

या कोल्हापुरी वातावरणात कोणता तिखट पदार्थ चाखता येईल, हे मी मेनूमध्ये बघत होतो. इतक्यात शेफ सुरज संकपाळ यांनी वेगवेगळ्या मसाल्यांनी भरलेली एक प्लेट समोर आणून ठेवली. कोल्हापुरी जेवण हे मसालेदार असलं तरी ते खूप तिखट असतं, असं अजिबात नाही. वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून कोल्हापूरी मसाला तयार होतो. आणि तो फार तिखट नसला तरी त्याची एक विशिष्ट चव आहे. आणि ही चव चाखायची तर एमएच ०९ शेतकरी मध्ये तुम्हाला एकदा तरी नक्की यायला हवं.

मसाल्याचं गणित समजून घेत, कोल्हापुरी शब्दांची ओळख करून घेत मी आज काय नवं खायला मिळणार याची वाट बघत होतो. कोल्हापुरी मटण थाळी आणि कोल्हापुरी चिकन थाळी समोर आली. कोल्हापुरातल्या या दोन गोष्टींना जगात कुठेही तोड नाही. खास कोल्हापुरी वाटण आणि कोल्हापुरी मसाले वापरून तयार केलेलं हे चिकन आणि मटण तुम्हाला मुंबईमध्ये तरी एमएच ०९ शेतकरी शिवाय अजून कुठे चाखता येईल असं वाटत नाही. सोबत कोल्हापूरचा प्रसिद्ध तांबडा आणि पांढरा रस्सा. कोल्हापुरी जेवण चाखण्याची इच्छा वाढवणारं हे आणखी एक कारण. महाराष्ट्रातल्या या दोन पदार्थांनी आपलं वेगवेगळेपण आणि खवय्यांच्या मनातलं स्थान आजही कायम ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच इथे आल्यावर हा तांबडा आणि पांढरा रस्सा चाखणं मला भागच होतं. या रस्स्याची चव कधीही न विसरता येण्यासारखीच. बरं. हा रस्सा तुम्ही मागाल तितका ही मंडळी तुम्हाला देतात.

या सगळ्या पदार्थांच्या सोबत ताटात होती ज्वारीची गरमागरम फुगलेली भाकरी. ही भाकरी म्हणजे स्वर्गीय सुख. त्यामुळे अगदी तीन एक भाकऱ्या मी या भेटीत फस्त केल्या. सोबत भात खायचा असेल तर इथला मसाले भात हा उत्तम पर्याय. तुम्हाला नक्की आवडेल याची हमी मी देतो. कोणतीही कोल्हापुरी थाळी घ्या, त्यात अंडा करी सुद्धा असते. चवीला दही-कांदा सुद्धा असतो आणि हे सगळं पचवायला सोलकढीही असते.

हे सगळं कोल्हापुरी वातावरण आणि हे अस्सल कोल्हापुरी पदार्थ खाल्ले की एकदम कोल्हापुरात आल्यासारखं वाटतं. आणि कसं झालंय जेवण ? असं कोणी विचारलं तर ‘लय भारी’ असं तुम्ही कोल्हापुरी तोऱ्यात सांगून मोकळे होतात. आणि पुन्हा कधी कोल्हापुरी मेजवानी चाखायला यायचं याचा विचार करतच या तुम्ही रेस्टॉरंटमधून निघतात. त्यामुळे काही तरी अस्सल कोल्हापुरी खायचं असेल, तर या रेस्टॉरंट नक्की भेट द्या.

आज मी भेट दिली ठाण्याच्या एमएच ०९ शेतकरी या रेस्टॉरंटला. पण, हा प्रवास काही इथेच संपलेला नाही. इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.

खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.