मानेपर्यंत लांब केस, वाढलेली दाढी, अंगात हाफ पँट आणि टी-शर्ट, पाठीवर इवलीशी बॅग, त्याला टांगून ठेवलेली एक निळी पाण्याची बॉटल, पायात मळलेले ट्रेकिंगचे शूज. मी कुठेही गेलो तरी साधारण हाच अवतार असतो माझा. माझा अवतार जसा भटका, तसंच राहणं-खाणं सुद्धा. डोक्यात, बोलण्यात फिरण्याचाच विचार असलेल्या माणसाला त्याच्या अवती भवतीच्या गोष्टीही तशाच लागतात. माझंही तसंच झालेलं. माझ्या मित्रांना जर तुम्ही हे वर्णन सांगितलं तर तुम्ही मलाच भेटलात हे ते बरोबर ओळखतील. मग सोबतची माणसं वेगळी का असावी? तीही भटकीच हवी ना. हे कळायला थोडा वेळच लागला. पण, हे लक्षात आलं तेव्हा समोर एक सुंदर मुलगी उभी होती. आणि तीही माझ्या सारखीच. भटकी.
एखाद्याच्या प्रेमात पडणं फार अवघड नाही. वेळ आली, तशी व्यक्ति समोर असली, मनं जुळली, सवयी जुळल्या की प्रेम होतं, हे ऐकून होतं. पण, या व्यक्तीला हे सांगायचं कसं? हा प्रश्न होताच. असं असलं तरी व्यक्त होण्याचं आणखी एक उत्तम साधन माझ्याकडे आहे. ते म्हणजे लिखाण. माझ्या लिखाणातून मी तुम्हाला माझी भटकंती सांगू शकतो, तर तिला एखादं छानसं पत्र का लिहू शकणार नाही. म्हटलं लिहूया. मनात काय आहे ते सांगूया. बघूया पुढे काय होतं.

आता मी जे लिहिलं ते असं.

खरं तर आतापर्यंतच्या माझ्या गर्लफ्रेंड तशा सुंदर होत्या, पण फार काळ काही टिकल्या नाहीत. त्यामुळे एकंदरच डोळ्यांवरचा विश्वास आता उडाला होता. एका नजरेत होणारं प्रेम आता शक्य नव्हतं. साधारणपणे चप्पल सुद्धा ‘ट्रेकला उपयोगी पडेल का?’ हाच विचार करून घेणारा मी. पण गर्लफ्रेंडच्या बाबतीत विचार वेगळे होते. त्यामुळेच नॉनव्हेज न खाणाऱ्या, ट्रेकला न जाणाऱ्या, फार न फिरणाऱ्या, वगैरे वगैरेच गर्लफ्रेंड आतापर्यंत लाभल्या. पण गेल्या ब्रेकअपनंतर मात्र या सगळ्या गोष्टींचा विचारच सोडून दिला. कोणी स्वतःहून आली तर विचार करू अशी खूणगाठ मनाशी बांधली. पण स्वत:हून आलेल्यांपैकी एकीलाही हो बोललो नाही. का? माहीत नाही. पण, हे प्रेम होणे शक्य नाही असंच वाटत असताना पुन्हा एका मुलीच्या प्रेमात पडलोय.

काहीही अंदाज नसताना तू अचानक आयुष्यात आलीस आणि माझा हात घट्ट पकडलास. त्या दिवशी ट्रेकला जायचं म्हणून सगळ्यांनाच मेसेज केलेले. अगदी नेहमी सारखे. ४-५ जण तयारही झालेले. तुलाही यायचं होतं. तू आलीस सुद्धा. पण इतरांनी मात्र टांग दिली. ऐन वेळी टांग नाही देणार ते मित्र कसले? पण, आपण जायचं ना? असं तुला मी हळूच विचारलं. आणि ‘अर्थात’ असं तू सहज बोलून गेलीस. थोडी धगधग होती. पण तुझा बिनधास्तपणाच ती धगधग कमी करण्यासाठी पुरेसा होता. त्यामुळे गड गाठायचा, तेही तुला घेऊनच हे ठरलं.

गेले दोन अडीच वर्ष सतत भटकतोय. कोणाचे हात पाय थरथरताना दिसले, कोणाला चढताना थाप लागलेली दिसली, की धावत जाऊन हात देतो. दुसऱ्या ट्रेकरला मदतीचा हात देताना कमी पडायचं नाही, हे ठरलेलं. पण त्या दिवशी ‘नीट बाजूला पकड, हिरवळ आहे, घसरशील हा, अरे वेड्या पडशील, हात पकड’ असं म्हणत मला हात देणारी तू पहिलीच. आणि हा हात पकडावा का हा विचार न करताच मी तो सहज पकडला. का? माहीत नाही. म्हणूनच ‘तुझ्यामुळे मी गड चढलो’ असं तुला चिडवत असतो.

संपूर्ण वाटेत बडबड करणारी, चाटून पुसून चिकन खाणारी, ट्रेकला जाणारी, आपल्या मित्रांच्या गोष्टी रंगवून सांगणारी ट्रेक नंतर सुद्धा तशीच आपल्या सोबत असेल का? हे मात्र माहीत नव्हतं. तू काही तरी विषय काढलास आणि गप्पा सहज रंगत गेल्या. आपले सगळे गुण जुळतात हे सांगायला आता पत्रिका दाखवण्याची गरज नव्हती. पण, तुला भेटायचं कसं? हा प्रश्न होताच. साधारण एखादी मुलगी ‘हो’ म्हणेल अशा सगळ्या जागा विचारून झाल्या. पण, तू काही भेटली नाहीस. आता तुला भेटायचं असेल, तर ट्रेकला तर जायला हवंच. म्हणून लगेचच दुसरा ट्रेक ठरवला. या वेळी ‘नक्की या’ म्हणत सगळ्या मित्रांना निरोप धाडला. नशिबाने या वेळी मित्र सुद्धा आले. पण, माझं लक्ष सगळं तुझ्याकडेच होतं. तुझ्यासाठी चिकन केलेलं. तेही तुला आवडलं. ट्रेक सुद्धा मस्त झाला. अधून मधून पावसानेही साथ दिली. हीच ती वेळ, विचारवं का तुला? असं वाटलं. पण नको. थोडा वेळ हवा. इतक्यात तुला एका खेकड्याच्या मागे धावताना पाहिलं. मग सुरू झाली खेकड्यांची शिकार. एखादा मोठा खेकडा दिसला की त्याच्या मागे धावत जायची. वाट्टेल ते करून जमतील तितके खेकडे पकडायचं, हे तू ठरवलेलं. आणि तुला साथ द्यायची हे मी ठरवलेलं. साधारण अर्धा डझन मोठे खेकडे आपण पकडले. आणि ते घेऊन आपण घरच्या दिशेने प्रवास सुरू केला. वाटेत बस पकडली. तुझी सिट खिडकी शेजारची आणि माझी तुझ्या बाजूची. हवा लागताच अवघ्या दोन मिनिटांत तू शांत झोपून गेलीस. मी किती तरी वेळ तुझ्याकडे बघत होतो. झोपेतही गोड हसत होती. कदाचित स्वप्नातही एखाद्या खेकड्याच्या मागे धावत असावी. आणि तो पकडला म्हणून तुला आनंद झाला असावा. खिडकीतून येणारा वारा तुझ्या बटा अगदी अलगत उडवत होता. पण तेव्हड्यात एक स्पीड ब्रेकर का खड्डा आला आणि तुझं डोकं आपटता आपटता वाचलं. पण, तू मात्र तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत दंग. मग फार विचार न करता तुला अलगद मिठीत घेतली आणि झोपून गेलो.

खरं तर त्या वेळी ती मिठी सुटूच नये इतकंच डोक्यात होतं. पण झोप कधी लागली कळलंच नाही. या झोपेत एक छानसं स्वप्न पडलं. हे स्वप्नं कधी खरं झालं, तर तो तुझ्या सोबत घालवलेला आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस असेल. या स्वप्नात कोण्या एका चांदण्या रात्री तू आणि मी, दोघंच एका डोंगरमाथ्यावर गेलो आहोत. जगाचा आणि आपला काहीच संबंध नाही, असं भासावं तसं निवांत वातावरण. दाही दिशांना शांतता, हवेत प्रचंड गारवा. त्यावर औषध म्हणून टेंटच्या बाजूला शेकोटी लावलेली. आणि त्या चांदण्यांनी भरलेल्या अवकाशाची चादर घेऊन आपण कॅरी मॅटवर शांत पडलो आहोत. तू एक टक त्या चांदण्यांकडे पाहत आहेस. आणि माझं सगळं लक्ष तुझ्याकडे. खरं सांगू तर त्या रात्रीतल्या साऱ्या चांदण्या तुझ्या पुढे फिक्या होत्या. आणि तू बाजूला आहेस याचाच मला जास्त आनंद होता. चांदण्यांचा हिशोब झाल्यावर तुझं लक्ष माझ्याकडे जातं. माझ्याकडे बघून तू हसतेस आणि घट्ट मिठी मारतेस. मी अलगद डोळे मिटून घेतो. पण तितक्यात तू म्हणतेस ‘चल, कर्जत आलं. उठ आता’ मी खरं तर स्वप्नातून बाहेर येतो. पण, समोर तू असतेस आणि मनात एकच प्रश्न असतो. कोणता? हे स्वप्न खरं होईल का?