रात्रीचे बारा वाजले होते. मी मरीन ड्राईव्हला उभा होतो. वर आकाशात फटाके फुटत होते. सगळे एकमेकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत होते. त्यांच्या उत्साहाला बांध नव्हता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद. आणि अचानक माझं स्वतःकडे लक्ष गेलं. मी काय करतोय हे? २०१७ची शेवट समाज कार्याने करायची म्हणून पोलिसांना चहा देतोय. पण, २०१७ संपलं. आता हातात उरलाय तो शेवटचा एक कप चहा. एका घोटात पिऊन टाकला आणि स्वतःला ‘हॅप्पी न्यू इयर’ म्हणालो. समाज कार्य हे काही माझं क्षेत्र नाही. पण, मित्रांसोबत हा उपक्रम केला. आता नवीन वर्षाची सुरुवात मात्र भटकंतीने व्हयायला हवी नाही का? हे तर आपलं क्षेत्र. ठरलं. या नवीन वर्षात खूप फिरायचं. मग, या भटकंतीची सुरुवात अगदी पहिल्या दिवसापासून का नाही?

अचानक फोन वाजला. अथर्वचा. समोरून आवाज आला. ‘समाजकार्य झालं असेल तर घरी जा, झोपा. सकाळी पाच वाजता निघायचं आहे.’ मी घड्याळ बघितलं. दीड वाजला होता. गप्पांमध्ये, शुभेच्छांमध्ये रात्रीचा दीड कधी वाजून गेला कळलंच नाही. आता सीएसटी वरून शेवटची लोकल गेली. आता घरी जायचं कसं? एखादी जादा गाडी आहे का? हे बघायला हवं.

कोणी तरी म्हणालं, ’३१ डिसेंबर म्हणून खास गाड्या सोडल्यात’ मी लगेच दोन-तीन मित्रांना घेऊन सीएसटी स्टेशन गाठलं. पण, सव्वा चार शिवाय ट्रेन नाही, हे तिथे गेल्यावर कळलं. तोवर काय करायचं? तर या मित्रांना घेऊन एक छोटासा फोर्ट भागातला हेरीटेज वॉक केला. स्टेशन परिसरात असलेल्या जुन्या वास्तू त्यांना बाहेरूनच दाखवल्या आणि हे सगळं फिरून चार वाजेपर्यंत पुन्हा स्टेशनवर आलो. ट्रेन पकडली.

तिथे मित्र मी पाच वाजता भेटणार या आशेत आणि मी इथे ट्रेनमध्ये डुलक्या घेतोय. घरी पोचायला पावणे सहा वाजले. पाच वाजल्यापासून वाट बघणाऱ्या मित्रांचा फोन येतच होता. तेव्हा पटकन निघायला हवं. ब्रश करून, बुटातले सॉक्स बदलून होतो त्या अवस्थेतच मी निघालो.

मित्रांची केळवे मोहीम ठरलेली. आधीच माझ्यामुळे उशीर झालेला. त्यामुळे मित्राने आपली बाईक वेगातच पुढे रामटवली. रात्री झोप न झालेलो मी थंड हवा लागताच डुलक्या खाऊ लागलो. पण आम्ही अहमदाबाद हायवे पकडला नि थंडी वाढत गेली. आता मात्र झोप लागेना. उलट हाफ पँट आणि टी शर्टवर निघालेलो असल्याने मी कुडकुडायला लागलो. पण त्याला इलाज काय? वाटेत नवीन वर्षातल्या पहिल्या सूर्योदयाला पाहण्यासाठी एकदा थांबलो तितकंच. तेव्हडीच काय ती ऊब.

सफाळ्याचा घाट उतरून सफाळे मागे टाकलं आणि नऊच्या आसपास केळवे किनार्‍याला पोचलो. त्या वेळी थंडी बऱ्यापैकी ओसरलेली. पण, रात्रीच्या जागरणानंतर पोटात कावळे ओरडत होते. पण, आधी शितलादेवीचं मंदिर आणि रामकुंड पहायचं ठरलं. आम्ही गेलो तेव्हा फार गर्दी नव्हती. दर्शन नीट घेता आलं. तिथून निघाल्यावर मात्र भूक आवरेनाशी झाली. आमच्या म्होरक्याने, सुमंताने एक छान ढाबा शोधला. गरमागरम मिसळ पाव समोर येताच आम्ही फार विचार न करता आडवा हात मारला. जादा पाव, जादा रस्सा, इत्यादी इत्यादी ती ऑर्डर पुढे वाढत गेली. पोटोबा मात्र आता प्रसन्न होता. आणि पुढची वारी करण्यासाठी सज्ज झालो होतो.

बाईकवर बसून शिरगावच्या भुईकोटकडे कूच केली. त्या दिवशी पाहीलेल्या किल्ल्यांतला हा सर्वात मोठा किल्ला. गावाच्या मधोमध असलेला, पोर्तुगीजांनी उभारलेला भुईकोट पाहण्यासारखा आहे. तिथल्या इतर किल्ल्यांपेक्षा तो मोठा आहेच, शिवाय भक्कमही आहे. राज्य खालसा झाली की किल्ले ढासळू लागतात. मात्र याचे चारही बुरुज अजून भक्कम आहे. भिंती बऱ्यापैकी शाबूत आहेत. यातील दोन बुरुजावर खिडक्या आणि छानसं छप्परही आहे. थोडा वेळ तिथेच थांबून आम्ही भरपूर फोटो काढले. आणि देवी महिकावतीचं दर्शन घ्यायला निघालो.

शिरगावातून निघालो आणि वाट शोधत शोधत आम्ही महिकावती मंदिरात येऊन पोचलो. तेव्हा ते रस्त्याला लागूनच असल्याचं दिसलं. चला. पोचलो, हे महत्त्वाचं. आत मंदिरात गेलो. तेव्हा मंदिराचा इतिहास लिहिलेला नजरेस पडला. महिकावती देवीच्या नावावरूनच या गावाला माहीम नाव मिळालं, हे माहीत नव्हतं. पण हे नाव कसं पडलं, ही कथा या पौराणिक मंदिरात वाचायला मिळाली. देवीची छान स्वयंभू मूर्ती आणि मंदिराच्या बाहेरचा दीपस्तंभ फार जुना आणि पाहण्यासारखा आहे. या भागात कधी फेरफटका मारलात तर कधी नुसतं समुद्र किनार्‍याला हुंदडून चालणार नाही. इथल्या महिकावतीच्या, महाकालीच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. म्हणूनच महिकावतीच्या देवळातून निघालो आणि थेट महाकालीच्या दर्शनाला निघालो. ऐंशी वर्षांचं लहानसं मंदिर. पण, स्थानिकांसह अनेकांच्या मनात घर करून बसलेलं. त्यामुळेच बाजूला नवं कोरं मोठालं मंदिर बांधलेलं असताना भक्त इथेच डोकं टेकवून जातात. आम्ही आलेलो कळताच एक आजोबा मंदिराचे चावी घेऊन आले. आम्हाला मंदिर उघडून दिलं. आजोबा सांगत होते. त्यांच्या आजोबांनी या मंदिराचा कारभार हाती घेतला, आता पुढच्या पिढ्या आजही हे मंदिर सांभाळतात. नवं मंदिर उभं राहिलेलं असलं तरी.

मंदिराबाहेर आलो तेव्हा सुमंताने एक वेगळीच गम्मत दाखवली. मंदिराच्या मागे एक माडाचं झाड आहे. या माडाला ५६ फांद्या आहेत म्हणे. मी मोजल्या नाहीत. पण असाव्यात. रावणमाड ही म्हणतात म्हणे याला. हा माड पाहून माहीम भुईकोटाकडे आम्ही मोहीम वळवली. इवलासा, पण अजूनही तग धरून उभा असलेला, सिनेमातल्या जुन्या हवेली सारखा भासणारा हा माहीमचा भुईकोट. तो पाहीला आणि आम्ही पुन्हा आमच्या बाईकवर बसलो. ही इतकी भटकंती करेपर्यंत पुन्हा भूक लागली होती. पण, ‘आरामात जेवू’ असं हळूच कोणी तरी म्हटलं आणि आम्ही माना डोलावल्या.

दौरा पुन्हा केळवे किनाऱ्याला वळवला. समुद्र किनार्‍याला सुरूच्या बनात लपलेला हा भुईकोट आमच्या सारख्या भटक्यांचाच नाही, प्रेमी युगुलांचाही लाडका. जेवायच्या आधी हा भुईकोटही पाहीला. म्हणे हा उंच होता, पण वाळू साचत जाऊन याचा मोठाला भाग आजही जमिनीखाली शांत पडून आहे. या केळव्याच्या किनार्‍यावर युध्द झाली असतील, व्यापार झाला असेल, विचारांची, संस्कृतीची देवाणघेवाण झाली असेल, तर त्याने पाहीलं असेल. त्याने हा सारा इतिहास अनुभवला असेल. पण तुम्हां आम्हां सारखं त्यालाही केळवा किनाऱ्याच्या वाळूनेच वेड लावलं. तिला बिलगून तो निपचित पडून आहे. अशाच आणखी एका साक्षीदाराला आम्ही त्या दिवशी भेटायला जाणार होतो, जो आजही समुद्रातून या किनाऱ्यावर पहारा देतोय. पण, भूक बडी चीज है.

नारळ पाण्याचा छोटा रिचार्ज मारून आम्ही एका हॉटेलात शिरलो. इथे जरा बरं खायला मिळेल, चमचमीत खायला मिळेल, अशी आशा दिसली. त्यात प्रत्येकाची आवड वेगळी. कोणी मासळी मागवली, कोणी चिकन, तर कोणी पालापाचोळा. अर्थात हे सगळं एक एक यायला तासभर गेला. आणि जे समोर येईल त्यावर ताव मारणं हाच आम्हाला उत्तम पर्याय वाटला. पण, जेवण चवीला अगदी छान होतं. बोटं चुकून खावीत इतकं. अगदी मन भरून आम्ही जेवलो. आणि तिथल्या अन्नपूर्णेसमोर हात जोडून आम्ही काढता पाय घेतला. कारण आमची भटकंती अजून संपली नव्हती.
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या किनार्‍याचा इतिहास पाहीलेला अजून एक साक्षीदार जिवंत आहे. त्याचा जबाब नोंदवल्याशिवाय ही केस क्लोज होणं शक्य नाही. आम्ही हा जंजिरा आधी केला नाही याचं एक कारण आहे. समुद्रात आजही ताठ मानेने हा जंजिरा उभा असला तरी ओहोटीच्या वेळी वाळूवर चालत तुम्ही याला भेट देऊ शकता. संध्याकाळी आम्ही या किल्ल्याच्या दिशेने कूच केली तेव्हा तो चारही बाजूने वाळूने वेढलेला होता. पाणी नुकतंच ओसरलं होतं त्यामुळे मऊ वाळू पायाला गुदगुल्या करून जात होती. समोर एखादी होडी समुद्रात उभी असावी, अशा आकाराचा हा केळवे जंजिरा. काही वेळ चालल्यावर या किल्ल्याजवळ आम्ही पोचलो. थोड्या ओल्या वाळूवर पाय देत आम्ही किल्ल्याच्या भिंतीजवळ आलो आणि त्या माखलेल्या पायांनी आम्ही भिंत चढून आतही गेलो.

‘हा पोर्तुगिजांचा जकात नाका’ आमचा माहितीगार सांगत होता. ‘याने युद्धं पाहीली, याने व्यापार पाहीला, आता इथल्या समुद्रात मनसोक्त डुंबायला आलेल्यांना हा पाहतो. पण खोल मनात खूप इतिहास त्याने आजही जपला आहे’ आम्ही फक्त कान देऊन ऐकत होतो. किल्ल्याच्या जवळ दांडा खाडी आहे, पुढे उसरणी गाव, मागे केळवा, माहीम भुईकोट, पोर्तुगीझांची वखार (कितर) आहे, म्हणजे कदाचित हे मोठं व्यापारी केंद्र असावं. आणि इथे व्यापारासाठी आलेल्या बोटींकडून जकात वसूल करायला बांधलेला हा जंजिरा असावा, याची शक्यता टाळता येणार नाही. आलं आणि मिरचीसाठी हे बंदर प्रसिद्ध होतं म्हणे. ओहोटी असो वा भरती, इथे दिवसभर वसुली व्हायची आणि ओहोटीच्या वेळी ही गोळा केलेली रक्कम कचेरीत नेऊन जमा केली जायची, असं म्हणतात.

मावळत्या सुर्यनारायणाचा मनमोहक नजरा आम्ही डोळ्यात साठवला आणि परतीचा प्रवास सुरू केला. आजच्या प्रवासाचं तिकीट संपलं हे खरंच वाटत नव्हतं. नव्या वर्षाची इतकी छान सुरुवात कधीच झाली नव्हती. आता आम्हां भटक्यांना थांबवणारं कोणी नव्हतं. ‘या महिन्यात ट्रेकला कुठे जायचं?’ या गप्पांना सुरुवात झालेली. आणि नवं वर्ष भरपूर भटकंतीने भरलेलं असेल, याची पक्की खात्री झाली.

२०१८ वर्षाची सुरुवात केळवा मोहिमेने केली. पण, हा प्रवास काही इथेच संपलेला नाही. इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.
खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.

(तुम्हालाही अशाच एखाद्या भटक्या मोहिमेला माझ्यासोबत यायचं असेल, तर ९००४०३५५१५ या क्रमांकावर नक्की कळवा.)