वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणं आणि तिथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणं हाच हा ब्लॉग सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश. पण, मी हा ब्लॉग सुरू करायचं ठरवल्यावर एक वेगळीच गोष्ट घडली. दक्षिणेकडेची कारवारी खाद्य संस्कृतीच माझ्याकडे चालून आली आणि ‘हे सुद्धा चाखून बघ’ असं सहज म्हणाली. मग अन्नाला नाही म्हणेन तो मी नाही. तेव्हा थेट अंधेरीचं हॉटेल कोहिनूर कॉन्टीनेंटल गाठलं आणि समोर होती अस्सल कारवारी मेजवानी.

सह्याद्री पर्वत रांगा आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये वसलेलं कारवार हे कर्नाटकातलं छोटंसं शहर. आणि इथल्या घराघरातील स्त्रियांवर जणू अन्न देवताच प्रसन्न आहे. इथल्या घरात बनलेलं जेवण जो जेवेल, ती चव तो आयुष्यभर विसरणार नाही. कारवारी खाद्य संस्कृतीची ही महती मी ऐकून होतो, पण त्याची लज्जत चाखता आली ती हॉटेल कोहिनूर कॉन्टीनेंटल मधल्या कारवारी फूड फेस्टिवलच्या निमित्तानं. नारळाच्या दुधात बनलेलं, तिखट कारवारी जेवण जेवता यावं, म्हणून त्या दिवशी मी आणि माझ्या फोटोग्राफरनं सॉलीटेअर रेस्टॉरंट गाठलं. त्या वेळी आतून सनई आणि इतर दाक्षिणात्य वाद्यांचा सुमधुर आवाज कानी पडत होता. आणि आत साक्षात अन्नपूर्णेच्या रुपात शेफ सौ. माधवी कामत आमची वाट पहात होत्या.

अस्सल कारवारी जेवण जेवायचं तर मुंबईकरांना फार दूर जायची त्या दिवशी गरज नव्हती. कारवारी फूड फेस्टिवलमध्ये एकापेक्षा एक चमचमीत पदार्थ त्यांची वाट पाहत होते. उकडा तांदळाचा भात (ज्यांना तो आवडत नाही त्यांच्यासाठी पांढरा शुभ्र आंबे मोरे भात) आणि त्यावर दली तोय (वरणाचा प्रकार), सोबत बटाटा तलासिनी, पडवळाची रानदोयी, उडीद मेथी करी, सिमला मिरची रोज, मसाला लावून तळलेले भाज्यांचे काप, आदी मेजवानी शाकाहारी जेवणासाठी आलेल्यांसाठी तयार होती.

जेवणातले पदार्थच इतके चमचमीत होते की मांसाहारी जेवणासाठी आलेल्यांनीही कारवारी जेवणावर आडवा हात मारला होता. कारवारी पद्धतीचं चिकन, सुंगाता तिकले (कोळंबीचं लोणचं), कुर्ल्या सुंगाता सुके (कोळंबी आणि खेकड्याचे सुके) म्हणजे जिभेला चव असणाऱ्या प्रत्येकासाठी मेजवानी होती. हे पदार्थ पुन्हा जाऊन घेणार नाही तो खवय्या कसला. शिवाय भातावर विसवान आंबट म्हणजे सुरमईचं तिखट कालवण होतं. सोबत चवीला म्हणून भाजीलो मासोली (भाजलेली सुकी मच्छी), तिसऱ्या वडे हे पदार्थ ताटात होते.

अर्थात हे सगळं खाऊन त्याचं उत्तम पचन झालं पाहिजे याची काळजी सुद्धा कारवारी खाद्य संस्कृतीमध्ये घेण्यात येते. जेवणासोबत नारळाचं पाणी, नारळाच्या दुधात बनवलेलं कोकमाचं सार, कोकम सरबत आणि कढी, आदी प्यायलं जातं. कारवारी फूड फेस्टिवलमध्येही ही पेय उपलब्ध करून देण्यात आली होती.

आज मी भेट दिली हॉटेल कोहिनूर कॉन्टीनेंटलच्या कारवारी फूड फेस्टीव्हलला. पण, हा प्रवास काही इथेच संपलेला नाही. इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.
खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.

कुठे?

काय खावं?

कारवारी पद्धतीचं चिकन, सुंगाता तिकले, कुर्ल्या सुंगाता सुके

किती खर्च?

प्रत्येक माणसामागे किमान एक हजार