आम्ही नाक्यावर गप्पा मारत होतो. खूप दिवसांनी सगळे मित्र भेटले. कोणाचं काय चाललं आहे, हे एकमेकांना सांगत होतो. माझ्या भटकंतीच्या गोष्टी मी त्यांना सांगत होतो. ट्रेक कसा झाला, हे ते ऐकत होते. तितक्यात माझा मित्र, दीपेश नेरपगारे म्हणाला, ‘आयुष्यात अजून काही वेगळं करायचं असेल तर मला जाताना भेट.’ दीपेश लहानपणीचा मित्र. लहानपणापासून खूप मस्ती आम्ही एकत्र केली. आता मोठमोठ्या टीमना हा पठ्ठ्या शिडाची बोट कशी चालवायची, हे शिकवतो आणि ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उतरून बक्षिसं कमावतात. पण, हा मला कुठे घेऊन चाललाय, याची काही कल्पना नव्हती.

गप्पा मारून झाल्यावर निघताना मी त्याला विचारलं, ‘भावा, काय सांगत होतास?’ ‘उद्या फ्री आहेस का? आपण बोट घेऊन सेलिंगला जाऊ’. दीपेशचं हे उत्तर ऐकून मी लगेच ‘हो’ म्हणालो. कोणत्याही साहसी गोष्टीसाठी मी नेहमीच तयार असतो. वेळ ठरली. ठिकाण ठरलं. दुसऱ्या दिवशी गेट वे ऑफ इंडियाला भेटून बोटीवर आम्ही जाणार होतो.

दुपारी आम्ही गेट वे ऑफ इंडियाला पोचलो, तेव्हा पाच दहा मिनिटं वाट पाहिल्यावर एक छोटी डिंगी बोट आमच्या समोर उभी राहिली. ‘या बोटीत बसून आपल्याला आपल्या बोटीवर जायचं आहे.’ दीपेशचं हे वाक्य ऐकत मी त्या बोटीत जाऊन बसलो. मी, दीपेश, प्रतिक, उमेश, गजानन आणि आणखी एक दोन जण या बोटीमध्ये होतो. बोटीची मशीन सुरू झाली. अवघ्या पाच मिनिटांत आम्ही एका नव्या कोऱ्या शिडाच्या बोटी समोर येऊन पोचलो. ‘ट्रायडेंट, दोन दिवस झाले आहेत घेऊन या बोटीला. आम्ही चालवून बघितली आणि आता तुला घेऊन चाललो आहोत’ दीपेशचं हे वाक्य ऐकून पोटात गोळा आला. बोट नीट चालते हे याने बघितलं, आता माणसं जिवंत परत येतात का हे बघायला कदाचित हा आपल्याला नेतोय की काय, असा प्रश्न मनात आला. पण, वयाच्या चौदाव्या वर्षापासून याच क्षेत्रात असलेले दीपेश नेरपगारे आणि उमेश नाईक साटम आमच्या सोबत असताना घाबरायचं कारण काय?

मी ‘ट्रायडेंट’मध्ये पाऊल ठेवलं आणि एक वेगळीच फिलिंग आली. अशा प्रकारच्या शिडाच्या बोटीमध्ये आपण कधीच बसलो नसतो. पण, आज दीपेशमुळे ही संधी मिळाली. मी, दीपेश आणि उमेश, तिघंच आता त्या बोटीमध्ये. बोटीत शिरताच या दोघांची एकच लगबग सुरू. ही बोट मशीनवर नाही, तर हवेवर चालते. तेव्हा ती बोट चालवण्या योग्य करण्यासाठी यांनी काही मिनिटं घेतली. मी त्यांच्याकडे एक टक पाहत होतो. किती ती धडपड. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असावी, बोट सुरक्षितपणे पुन्हा परत यावी, म्हणून प्रत्येक गोष्ट दोन वेळा ते तपासून पाहत होते. ‘याला डेक म्हणतात. बोटीचं सगळं सामान यामध्येच होतं. आता यामध्ये फक्त आईसबॉक्स आहे. आपण काही खायला आणलं तर यामध्ये ठेवता येतं. आत लाईफ जॅकेट आणि इतर काही गोष्टी सुद्धा आहेत. पण, मी असताना ते वापरण्याची वेळ आपल्याला येणार नाही.’ उमेश काय म्हणतो, ते मी फक्त ऐकत होतो. ‘तुला जर कोणाचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर ही बेस्ट जागा. आईसबॉक्समध्ये केक उत्तम स्थितीत राहतो. समोर मावळणारा सूर्य, शिडाच्या बोटीचा आगळा वेगळा अनुभव आणि मोजक्या जवळच्या लोकांसोबत साजरा केलेला वाढदिवस म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असेल.’ दीपेश सांगत होता. कल्पना छान आहे. विकण्यासारखी आहे. मुंबईच्या समुद्रात अशा प्रकारे वाढदिवस साजरा करायचा असेल, तर दीपेश आणि उमेश यांची ‘ट्रायडेंट’ बुक करायला हरकत नाही. सिद्धेश वारंग याने दीपेश आणि उमेश या मित्रांना ही बोट विकत घेऊन दिली ती ‘ड्रीम्स सेलिंग क्लब’ सुरू करण्यासाठी. हा क्लब आता तुम्हां आम्हाला सगळ्यांना या बोटीने मुंबई लगतच्या समुद्राची सफर घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.

बोट सेलिंगसाठी सज्ज. ‘उमेश, तू पडून राहा. मी आणि दीपेश आज फोटोमध्ये येणार, आम्हीच बोट चालवणार’ दीपेशचं हे वाक्य ऐकून मला टेन्शन आलं. मला यातलं काहीच माहीत नाही. मी काय मदत करणार याला. ‘या समोरच्या दोन लाल दोऱ्या तू पकडायच्या. जेव्हा एक खेचशील तेव्हा दुसरी सोडायची. कधी कोणती सोडायची ते मी सांगेन.’ मी मान डोलावून ‘मला कळलं’ असं दाखवलं. पण, खरी भीती पुढे होती. ‘बोट डाव्या बाजूकडे झुकली की उजव्या बाजूला येऊन बसायचं, आणि उजव्या बाजूला झुकली की डाव्या बाजूला बसायचं.’ मी फक्त ऐकलं आणि गप्प बसलो. उमेश फोटोमध्ये यायचं नाही, म्हणून खाली झोपून होता. मात्र, त्याचं लक्ष आमच्याकडे होतंच. प्रतिक आमचे फोटो काढण्यासाठी समोरच्या एका कोस्ट गार्डच्या बोटीमध्ये कॅमेरा हातात घेऊन उभा होता. आणि आम्हाला त्याच्या बोटी पर्यंत जाऊन गोल गोल फिरायचं होतं. तेव्हा हा पठ्ठ्या आमचे फोटो काढणार होता.

दीपेश नेरपगारेला बोट चालवताना मदत करताना

हवेचा वेग वाढत होता. ‘रेडी?’ दीपेशने विचारलं. मी मान डोलावून ‘हो’ म्हटलं. आणि सुरू झाला एक वेगळाच थरार. हवेच्या दबावामुळे प्रत्येक वेळी बोटीची दिशा बदलताना बोट वाकत होती. आम्ही बोटीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला उड्या मारत होतो. मलाही शिडाची बोट चालवण्याचा एक वेगळाच अनुभव मिळत होता. दीपेश सांगेल तसं मी फक्त करत होतो. बोटीतल्या अनेक नव्या गोष्टी, त्यांना काय म्हणतात, त्या बोटीमध्ये का असतात, हे कळत होतं. कोस्ट गार्डच्या बोटी भवती गोल गोल फिरत आम्ही नव्या कोऱ्या ‘ट्रायडेंट’चे खूप फोटो काढले. आमचं ही फोटो सेशन झालं.

पुढे आमची बोट कोस्ट गार्डच्या बोटीला लावत इतरांनाही आमच्या बोटीमध्ये घेतलं. ‘सहा जणं आणि मी, एकूण सात जण या बोटीमध्ये एका वेळी बसू शकतात.’ उमेश सांगत होता. सगळे जण बोटीत बसल्यावर पुन्हा दीपेश आणि उमेशने बोट चालवायला सुरुवात केली. यावेळी मात्र बोट एका बाजूला वाकत नव्हती. ती संथपणे हवेसोबत पुढे जात होती. ‘जेव्हा आपल्या बोटीवर कोणी फिरायला येणार तेव्हा त्याला बोटीतून असं अलगद नेणार. पोटातलं पाणी पण हललं नाही पाहिजे.’ दीपेश म्हणाला. पण, मला तर काही वेळापूर्वीची हेलकावे घेणारी बोट जास्त आवडलेली.

त्या रात्री चंद्राला ग्रहण लागणार होतं, ते पाहण्यासाठी आणखी काही मंडळी आमच्या सोबत बोटीमध्ये होती. मावळतीचा सूर्याला पाठ करून आम्ही मुंबईच्या समुद्रात वेगाने पुढे जात होतो. ‘हे मिडल ग्राउंड, हे सनरॉक, हा ससून डॉक, हे ऑयस्टर रॉक, तिथे पुढे मांडावा, या बाजूला उरण’ पुस्तकांत आणि नकाशांमध्ये पाहीलेल्या मुंबईच्या समुद्रातल्या विश्वाची मी नव्याने ओळख करून घेत होतो. थोड्या वेळातच काळोख झाला. भूक लागली. सोबत आणलेला खाऊ डेकमधून बाहेर आला. कोल्ड ड्रिंकचे कॅन हातात आले. त्यांचा आस्वाद घेत आम्ही ग्रहण पाहत होतो.

‘परतीचा प्रवास सुरू करायला हवा. नऊ वाजायला आले.’ उमेश म्हणाला. रात्रीचे नऊ ही कोस्ट गार्डनी सगळ्यांना घालून दिलेली वेळ. समुद्रात गेलात तर नऊ वाजायच्या आधी गेटवेला पोचायला हवं. नऊ वाजायला आले तसं एक छोटी डिंगी बोट आम्हाला घ्यायला आली. दीपेश आणि उमेशने आपल्या बोटीवरचा कारभार आटपायला घेतला. आमचा मोर्चा आम्ही गेट वेच्या दिशेने वळवला, तेव्हा गेले चार-पाच तास आम्ही समुद्रात होतो, यावर आमचा विश्वासच बसेना. वेळ इतक्या पटापट पुढे जातोय, हे आता कुठे कळायला लागलं होतं. गेट वेला उतरल्यावर काढलेले फोटो बघत आम्ही तो प्रवास पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न केला. पण, पुन्हा एकदा शिडाच्या बोटीने, ट्रायडेन्टने कुठे तरी प्रवासाला जायचं, हे मात्र आम्ही मनात पक्कं केलं.

आज मी भेट दिली दीपेश आणि उमेशच्या ‘ट्रायडेंट’ बोटीला. पण, हा प्रवास काही इथेच संपलेला नाही. इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.

खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.

( तुम्हालाही या ‘ट्रायडेंट’ बोटीच्या सफरीवर जायचं असेल तर खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा. )