‘इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला तोरणा किल्ला तुम्हाला आठवतो का? आपण त्याच किल्ल्यावर जाणार आहोत.’ मी मित्रांना सांगत होतो. आणि अचानक एक जण मला थांबवून म्हणाला, ‘अरे तिथे भूत आहे तेच ना?’ त्याला काय उत्तर देऊ हे माहीत नव्हतं. पण ‘तू भुताला घाबरतो का?’ असं त्याला मी सहज विचारलं. ‘छे, अजिबात नाही’, असं तो म्हणला. ‘मग तुला यायला काय हरकत आहे?’ मी म्हणालो. आणि तो यायला तयार झाला.

पण, तोरणावर खरंच भूत आहे का? मीही तोरणा केला तो याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हो, तोरणावर भूत आहे. कोणाचं? ते कधी दिसतं? काय करतं? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मी देणार आहे. कारण आपण आज त्याच भुताला भेटायला निघालो आहोत.

तोरणाला जायचं हा बेत खरं तर माझ्या मित्राचा, अथर्वचा. पण, मीही लोकांना तोरणाला येतात का? म्हणून विचारत होतो. तोरणा वर काय झालं? माहीत आहे तितका इतिहास त्यांना सांगितला. किल्ला किती मोठा आहे? फिरण्यासारखं खूप काही आहे, हे सांगितलं. पण, जिथे भूत आहे अशा ठिकाणी एक रात्र राहायचं आहे, तेही अमावास्येची रात्री, हे काही त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. त्यामुळे अनेकांचा नकार ऐकूनच मी ट्रेकची तयारी करत होतो. पण, येतील तितकी मंडळी घेऊन तोरणा करायचा आणि तोरणा वरच्या या भुताला भेटायचं, त्याला तीन चौघांनी घेरायचं आणि विचारायचं की का त्रास देतोस गड्या? आम्ही काय तुझं घोडं मारलं? हे मी ठरवलेलं.

बॅगा भरल्या. कोण येतंय, कोण नाही हे विचारतच घरातून निघालो. ठाणे स्टेशन गाठलं तेव्हा आम्ही इन मीन पाच जणंच ट्रेकला उरलो होतो. पण हरकत नाही, तोरणा सर करायचाच, हे आम्ही एकमेकांना सांगितलं आणि साईनगर शिर्डी मेल पकडली. अर्थात गम्मत अशी की तोरणावर भूत आहे, हे सांगणाराही आमच्या सोबत होता. मात्र, तो या भूतांना घाबरत नाही, हे त्याने सांगितलं, त्यामुळे आम्हाला त्याला न्यायला हरकत नव्हती.

आमच्या ट्रेनमध्ये गप्पा चाललेल्या. ‘तुझा गण कोणता?’ ‘मनुष्य गण’ ‘मनुष्य गण असलेल्या लोकांना भूत पकडतं आणि त्रासही देतं हे माहिती आहे का तुला’, तोरणाला भूत आहे हे सांगणार्‍या मित्राला अथर्व सांगत होता. ‘मग काय झालं? घाबरतो का मी?’ असं त्याने अथर्वला विचारलं, तेव्हा अथर्व माझ्याकडे वळला, ‘तुझा गण कोणता?’ मला उत्तर माहीत नव्हतं. ‘नक्की माहीत नाही, पण, खाण्याच्या आणि भटकण्याच्या सवयी लक्षात घेता माझा राक्षस गण असावा, असंच वाटतं.’ असं म्हणून मी मोकळा झालो. प्रत्येक जण ट्रेनमध्ये बसल्या बसल्या त्यांना माहीत असलेल्या भुताच्या गोष्टी सांगत होतं. अर्थात यांच्या पैकी एकानेही भुताला स्वतः पाहिलेलं नाही. या सगळ्या गोष्टी त्यांनी ऐकलेल्या. त्यांच्या मामा, काका, आजोबांना मात्र हे भूत पाहता आलं. या भुतांनी यांना त्रास दिला. पळवून लावलं. मग काय काय ते उतारे यांच्या घरच्यांनी केले. तेव्हा कुठे ते भूत शांत झालं. आणि निघून गेलं ते कायमचं.

तोरणा किल्ला सर करायला निघालेले दोस्त

मी इतका वेळ भुताच्या गोष्टी ऐकत होतो. आपण इतके कमी नशीबवान का? एकाही भुताला आपल्याला दर्शन द्यावसं वाटू नये, इतकं पाप आपण केलंय का? हे प्रश्न मला पडू लागले. पण, आज आपण चाललो आहोत ती तर भूतांची शाळाच. आणि या शाळेच्या रिकाम्या तासाला बाई त्यांना गडावर मोकळं सोडतात. आणि ही भूतं तर चक्क गडावरची खिडक्या दारे वाजवत सुटतात. कोणी बाहेर झोपलं तर त्याला उठवून त्रास देतात. रात्रीच्या वेळी गडावर फिरणाऱ्याला त्याची वाट दाखवायला येतात आणि गडाच्या पार पायथ्याला नेऊन सोडतात. तोरणा वरच्या या भुतांच्या एकाहून एक गोष्टी मी ऐकल्या. पण आज भुतांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. त्यांच्या पैकी एकाला तरी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी माझ्या समोर येणं भाग होतं. आणि भूत येणार का? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला.

गप्पा मारता मारता आम्ही पुणे कधी गाठलं, आम्हालाच कळलं नाही. रिक्षा करून स्वारगेट बस डेपोला गेलो. बस सकाळी होती. तेव्हा डेपोच्या बाहेर बसून आम्ही एकमेकांना पुण्यात आलो आणि काय झालं, याचे किस्से सांगत होतो. इतक्यात आमचं लक्ष गेलं बाजूच्या बुर्जी पावच्या गाडीकडे. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये तव्यातून आग काढत पदार्थ बनत असतात, तशी इथे बुर्जी बनत होती. आमच्यातला एक जण कॅमेरा घेऊन तिथे गेला. गर्दी होती त्याच्याकडे. आम्हीही जाऊन तिथे बसलो. डबल बुर्जी पावाचा पोट भरून नाश्ता केला. आणि पुन्हा डेपोला जाऊन थोडं झोपावं म्हणून हात पाय पसरले.

स्वराज्य स्मारक स्तंभ, नसरेपूर फाटा.

सकाळी चहा आणि क्रीमरोल खाऊन आम्ही दिवसाची सुरुवात केली. पुन्हा डेपोला आलो तेव्हा डेपोमध्ये भोर गाडी लागली होती. ‘भोर गाडीने नसरापूर फाट्याला जाऊ, तिथून तोरणाच्या पायथ्याला असलेल्या, वेल्हे गावात जायची आपली सोय होईल’, अथर्व सांगत होता. आम्ही माना डोलावल्या आणि आमची बिर्‍हाडं गाडीमध्ये हलवली. ‘थोड्या वेळाने वेल्हे गावात जाणारी गाडी सुद्धा आहे, पण नसरापूर फाट्याला उतरूनच आपण जाऊ. तुझ्यासाठी एक गम्मत आहे.’ अथर्व म्हणाला. मी मनात म्हटलं, ‘बघूया काय नवीन प्रकार आहे हा?’ आणि नसरापूर फाट्याला जाऊन पाहतो तर खरंच आश्चर्याचा धक्का बसला.

नसरापूर फाट्याला अगदी मुख्य रस्त्याच्या बाजूलाच एक दगडी स्तंभ आहे. हा काही साधा सुधा स्तंभ नाही. हा आहे स्वराज्य स्मारक स्तंभ. १९४५ मध्ये भोर संस्थानचे अधिपती श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्मारक म्हणून हा स्तंभ या ठिकाणी उभारला. खरं तर त्या वेळी ब्रिटिश राजवट. पण, अशा वेळी एका संस्थानिकाने हे असं स्मारक उभारणं म्हणजे किती धाडसाचं नाही. तोरणा किल्ला घेण्यासाठीचे डावपेच शिवरायांनी आणि त्याच्या मावळय़ांनी याच ठिकाणी बसून आखले, असं म्हटलं जातं. स्वराज्याचा श्रीगणेशा ज्या जागी झाला तिथेच हे स्मारक हवं म्हणून भोरच्या संस्थानिकांनी हे स्मारक इथे उभारलं. वर्षाला इतके लोक तोरणा राजगड किल्ला करतात, पण हा स्तंभ अजूनही तसा दुर्लक्षितच.

एका दगडी चौथऱ्यावर खाली चौरस, मग त्यावर अष्टकोनी आणि वर गोल असा हा स्वराज्य स्मारक स्तंभ. या स्तंभाखाली तत्कालीन भोर संस्थानात असणाऱ्या किल्ल्यांची नावे आणि त्यांची मैलात असलेली अंतरे त्या-त्या दिशेला संगमरवरी पट्टीवर कोरलेली आहेत. स्तंभावर भवानी देवीच्या पूजेचा प्रसंग कोरण्यात आला आहे. त्याखाली त्याची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला हाच मजकूर इंग्रजी भाषेत असून धनुष्यबाण आणि बाणाचा भाता कोरलेला दिसतो. तसेच स्तंभावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेला प्रसंग आणि शिवरायांची राजमुद्रा कोरलेली आहे. जवळपास ९ मीटर म्हणजे ३० फूट उंचीचा हा स्तंभ आवर्जून पाहावा, असा आहे.

स्वराज्य स्मारकासमोर डोकं ठेऊन आम्ही वेल्हे गावाकडे निघालो. गावात पोचल्यावर कळलं की किल्ल्याला वेल्हेतून जायचं तर अगदी वरपर्यंत गाडी जाते. किल्ला तासाभरावर आला की तिथून चालावं लागतं. एखाद्या ट्रेकरला तुम्ही गाडीने किल्ल्यावर जायचं आहे, हे सांगितलं तर तुमच्या समोर हात जोडून उभा राहील आणि दुसरा कोणता मार्ग नाही का किल्ल्यावर जायचा हाच प्रश्न विचारेल. आम्हीही तेच केलं. ‘थोडं पुढे गेलात की विहीर लागेल तिथून चढायला सुरुवात करा. रस्ता थेट गडावर जाईल’, असं गावातल्या एकाने सांगितलं. त्याच्या म्हणण्यावरून आम्ही याच वाटेने जायचं ठरवलं.

दुसऱ्यांची ओझी वाहून नेणारा मी

रस्ता वरपर्यंत जात असल्याने या पायवाटेवर आमच्या शिवाय कोणी नव्हतंच. भर उन्हात वाट शोधत आम्ही वर जाताना एका ठिकाणी आम्हाला वरून घोषणा ऐकू आल्या. तीन तासांची पायपीट झाल्यावर माणसं दिसू लागली. थोडं पुढे गेल्यावर गाड्या लावतात तिथे आम्ही पोचलो. ‘अरे चालत का आलात ? गाडीने यायचं की ?’ काहींनी सल्ले दिले. त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि पुढचा गड चढायला सुरुवात केली. प्रत्येकाला घाई होती ती भरपूर फोटो काढायची. आणि गड बघून पुन्हा घरी जायची. का? तर कारण एकच होतं, ‘तोरणा वरचं भूत’

गडावरच्या वाटेवर एएसआयच्या एकाने आम्हाला जाब विचारावा तसं विचारलं ‘गडावर राहणार दिसताय’ आम्ही माना डोलावल्या. ‘किल्ला बघायचा आणि घरी जायचं लवकर. आज अमावस्येची रात्र आहे’ असं त्याने सांगितलं. आम्ही पुन्हा माना डोलावल्या आणि पुढे गेलो. ‘बघितलं, बोललो होतो ना. भूत आहे.’ मित्राने सांगितलं. ‘पण तू तर घाबरत नाहीस ना’ मी म्हणालो आणि तो गप्प झाला. गडावर कोणी नासधूस करू नये, सुरू असलेल्या कामामध्ये अडचण नको, कोणी दंगा करू नये, म्हणून गडावर राहायचं नाही, हे सांगितलं जातं, पण ते कोण ऐकणार म्हणून भुताची भीती?

गडावरच्या हौदाच्या बाजूने एक वाट वर जाते. तिथे मेंगाई देवीचं मंदिर आहे. तिथे पोचताच आम्ही पाठीवरच्या बॅगा जमिनीवर टेकवल्या. आमच्या सोबत ट्रेकला आलेले सगळे बहुतेक नवखेच होते. दुपारच्या रणरणत्या उन्हात बाहेर फिरण्यापेक्षा आम्ही पायांना विश्रांती दिली. गप्पा मारल्या. सोबत आणलेला खाऊ खाल्ला. आणि ऊन कमी झाल्यावर गड पाहायला निघालो. संध्याकाळचे सहा वाजले असतील. गडावर काम करणाऱ्या मंडळींनी आपली कामं आटोपून जेवणाची तयारी केली होती. आम्हाला नवल वाटलं. ‘कदाचित भूत येण्याआधी झोपूया असं ठरलं असेल त्यांचं’, असं एक जण हळूच म्हणाला. आणि गडावरच्या त्या शांततेत एकच हशा पसरली.

मेंगाई देवी मंदिर. किल्ले तोरणा

घरी फोन करून झाले. शक्य तितका गड पाहून आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठी कोकण दरवाज्यावर पोचलो. मावळतीच्या सूर्याने सारं आभाळच लालसर केलं होतं. त्याच्याकडे बघत आज इथेच मुक्काम ठोकायचा, उद्या सकाळी उठून बुधला माची करायची हा बेत आखत होतो. गडावर प्रचंड वारा. जशी वेळ सरत होती तसा वारा वाढत होता. आणि थंडीही अंगाला बोचत होती. या कोकण दरवाज्यातच राहायचं असं ठरवलेल्यांनी आपण पुन्हा मेंगाई देवीच्या मंदिराकडे निघायचं का? हा प्रश्न केला. आम्ही त्या थंडीमध्ये कुडकुडत होतो. त्या अंधारात वाट काढत पुन्हा मंदिरात येऊन पोचलो.

सूर्यास्त टिपताना अथर्व

सगळ्यांनी पाठ टेकली. आपणही थोडी विश्रांती घ्यावी असं मला वाटलं. मीही स्लीपिंग बॅग काढली आणि त्यात गायब झालो. पण, भूत वगैरे काही नसतं, मी काही घाबरतो का? असं म्हणणाऱ्या मित्राला मात्र झोप नव्हती. जशी वेळ पुढे जात होती, तसं त्याचं भूत येऊन खिडक्या वाजवू लागलं. थोडा वेळ चादरीत डोकं खुपसून त्याने झोपण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला ते काही जमलं नाही. शेवटी मला उठवलं. ‘काय झालं?’ म्हणाला, ‘भूक लागली आहे.’

दोघंच टॉर्च घेऊन निघालो. गडावर कुठे काही जळण मिळतं का बघत होतो आम्ही. गडावर काम कळणाऱ्या लोकांनी जळणासाठी पुरेशी लाकडं जमवलेली. त्यातलीच काही उचलली. सुकलेलं गवत उपटलं. गडावरच्या टाकेतून पाणीही घेऊन आलो. काय बनवायचं? माझ्या बॅगेत मॅगी होती. खाली बटाटे ठेवले. त्यावर चूल लावली. दोघांना पुरेल इतकी मॅगी बनवली. इतक्या थंडीमध्ये, तुम्ही साडे चार हजार फुटांवर बसलेले असतात, तुम्हाला भूक लागते आणि समोर असते चुलीवर बनवलेली गरमागरम मॅगी. याहून स्वर्गीय सुख ते काय? आमच्यातला एक हॉटेल मॅनेजमेंट करतोय, हे कळालं. त्याला उठवून खिचडी करायला बसवलं. खिचडी झाली, ती खाल्ली. पुन्हा सगळे आपल्या चादर घेऊन झोपले. मी चुलीतले बटाटे काढून ते मंदिराच्या पायरीवर बसून खात होतो. नजरेच्या समोर होतं मोकळं तारांगण. इथेच रात्र काढावी, ताऱ्यांकडे बघत राहावं, असं वाटत होतं. पण, थंडी अतिशय प्रचंड. कदाचित सकाळी मित्रांना बर्फच मिळाला असता. चुलीत शिजलेले बटाटे खाऊन मी मंदिरात गेलो.

थंडीने गारठलेला ओमकार

थोडा वेळ झोपलो असेन, इतक्यात आला आवाज आला, ‘दादा’. भूत आलं. भूत म्हणालं, भीती वाटतेय. मी पुन्हा डोळे चोळले आणि नीट बघितलं. हे आमचंच भूत. ‘दारं-खिडक्या बघ कशी वाजत आहेत, भूत आलं.’ मी हसलो. तो अजूनच घाबरला. बाजूचा मित्र घोरत होता. ‘याच्या घोरण्याने येईल का भूत इथे?’ असं त्याला म्हणून मी पुन्हा हसलो. त्याचा विश्वास बसेना. शेवटी ‘चल, भूत बघायला जाऊ’, असं म्हणून आम्ही दोघं निघालो. दरवाजा उघडला. बाहेर कोणी नव्हतं. ‘बघ कोणी नाही इथे’ मी म्हणालो. ‘बघ कोणी नाही इथे तरी दरवाजा वाजत होता’ ‘अरे तो वाऱ्याने’ आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घातली, पण भूत काही दिसलं नाही. ‘एक असताना दुसरं भूत येत नाही. तू आहेस ते कमी आहे का? रात्री येऊन दादा म्हणून घाबरवतोस’ याची बडबड ऐकण्यापेक्षा झोपूया असा काहीसा चेहरा करत तो मंदिरात गेला.

मी तथेच पायरीवर आडवा झालो. मंदिरात जावसंच वाटत नव्हतं. थंड वातावरणात एखाद्याला त्याच्या प्रेयसीची आठवण येईल. पण मी मात्र ताऱ्यांमध्ये दंग होतो. सप्तर्षी कोणते? ध्रुव तारा कोणता? तो शनी दिसतो म्हणे. त्याला रिंगण आहे का? ज्ञान तोकडं होतं. पण, तिथे परीक्षा घेणारं कोणी नव्हतं. मी तर्क लावत आकाशाकडे एक टक पाहत होतो. आणि ताऱ्यांच्या त्या ढिगार्‍यातून एक उल्का हळूच खाली कोसळत गेली. मी एक सेकंद पाहत राहिलो. काहीच कळेना. डोळ्यांवर विश्वास बसेना. मुंबईमध्ये एखादा तारा शोधायचा तर नेहरू तारांगणला जावं. आणि प्रोजेक्टर खाली बसून पाहावं. पण, इथे डोळ्यांना जे दिसत होतं. ते केवळ भाग्यच. कदाचित पूर्व जन्माची पुण्याई असावी, की हा सोहळा पाहता आला. उल्का पडताना पाहण्याचा तो माझा पहिलाच प्रसंग होता. तो मी माझ्या नजरेत आजही कैद करून ठेवला आहे. तोरणा वरच्या त्या भुताने मला खरं खुरं दर्शन दिलं नसलं तरी त्याने मला मंदिरातून बाहेर आणलं. त्या तारांगणाखाली बसवलं आणि जे दिसतंय ते अद्भुत आहे, ते बघ, असं सांगितलं. म्हणून तुमचा विश्वास नसेल कदाचित पण, त्या भूताचं अस्तित्व मी मानतो. मुद्दामहून अमावास्येला ट्रेकला जातो. भूत खरंच असतो का हे बघायला आणि भूत अजून काय काय दाखवेल हे बघायला.

बुधला माची, किल्ले तोरणा

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गडावरची बुधला माची केली. आणि गड उतरायला घेतला. भूत दिसलं नाही, म्हणून मित्र थोडे निराश होते. पण, मी मात्र खूष होतो. परतीच्या प्रवासात मित्रांना भुताची गोष्ट सांगत होतो. तुम्हाला सांगितली तीच. ‘तोरणा वर भूत आहे का ?’ कोणी विचारलं तर मी ‘हो’ असंच सांगतो. तर तुम्ही कधी येताय तोरणा वरच्या या भुताला भेटायला?

आज मी भेट दिली भोर तालुक्यातील तोरणा किल्ल्याला. पण, हा प्रवास काही इथेच संपलेला नाही. इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.

खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.

(तुम्हालाही हा ट्रेक करायचा असेल तर 9004035515 वर संपर्क करा किंवा खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा.)

कुठे आहे हा किल्ला?

कसं जायचं?

स्वारगेट डेपो थेट वेल्हे गावात जायला गाड्या आहेत.

कधी जावं?

वर्षभरात कधीही

अजून कुठे कुठे जाता येईल?

नसरेपूर फाट्यावरील स्वराज्य स्मारक स्तंभ, नसरेपूर गावातलं बनेश्वर मंदिर, समोरच दिसणारा राजगड, राजगड-तोरणा रूट