मराठमोळ्या खाद्य संस्कृतीच्या मी प्रेमात आहेच. पण, इतर पदार्थही मी आवडीने खातो. मी तर म्हणतो की पदार्थ कोणताही असो, चव तुमच्या जिभेला असते. आणि प्रत्येक वेळी काही तरी नवं चाखायची इच्छा तुम्हाला आहे तोवर हा प्रवास असाच सुरू राहणार. ठाण्यात पाऊस पडत होता आणि आज कुठे तरी एखाद्या नव्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन येऊ, असा विचार मनात डोकावून गेला. लगेच मित्राला घेऊन निघालो ठाण्यात ठाण्याच्या हिरानंदानी मेडोज येथे उघडलेल्या ‘ड्रंकन मंकी’ या नव्या ज्यूस बारला भेट द्यायला.

दुपारची वेळ होती आणि बाहेर पाऊस पडत होता, त्यामुळे ‘ड्रंकन मंकी’ या ज्यूस बारमध्ये पोचलो, तेव्हा फार गर्दी नव्हती. ज्यूस बार अगदीच छोटेखानी, पण तरुणाईला आकर्षित करतील अशा अनेक गोष्टी त्यात भरभरून होत्या. अर्थात, चमचमीत पदार्थ ही त्या यादीतील पहिली गोष्ट. काय खावं हा प्रश्न होताच. काही तरी वेगळं मिळतंय का हे बघायला आम्ही या ज्यूस बारमध्ये पोचलेलो. पण, जेव्हा हातात तीन तीन मेनू कार्ड आले तेव्हा मात्र तेव्हा आम्हाला कळलं की भरपूर प्रकारचे पदार्थ तुम्हाला या एकाच ज्यूस बारमध्ये मिळू शकतात. फळांचा राजा आंबा सगळ्यांच्याच आवडीचा. त्यामुळे खास आंब्याच्या स्मूदी आणि मिल्कशेकचे वेगवेगळे प्रकार या रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध आहेत. त्यासाठी इथे वेगळे मेनू कार्डही तुम्हाला देण्यात येतं. तर एका मेनू कार्डमध्ये वेगवेगळ्या स्मूदी, मिल्कशेक आणि कॉफी तर दुसऱ्या मेनू कार्डमध्ये फक्त गरमागरम पदार्थ देण्यात आले आहेत. वेगवेगळे पदार्थ समजून घेत आम्ही या पदार्थांच्या भल्या मोठ्या यादीतून पुढे जात होतो. नेहमीच्या फ्रेंच फ्राईज सोबत इथे इतरही अनेक प्रकारचे फ्राईज आम्हाला दिसले. शिवाय रोल आणि सँडविचचेही अनेक प्रकार तिथे होते. यातून क्रीम अँड ओनियन फ्राईज आणि चिकन टिक्का सँडविच खायचं ठरलं. तर सोबत आयरिश क्रीम कॉफी शेक, ब्रावनी नटेला शेक ऑर्डर केलं. तर अप द अल्प म्हणून नवं ज्यूस दाखल झाल्याचं कळलं, त्यामुळे आम्ही तेही ऑर्डर केलं.


ऑर्डर यायला अजून थोडा वेळ होता. तोवर रेस्टॉरंटमध्ये नजर फिरवली. एका कोपर्‍यात ऊनो, झेंगा, चेस, ल्युडो असे वेगवेगळे खेळ ठेवले होते. त्यातूनच एक उचलून आम्ही थोडा वेळ खेळलो. वेळ कसा गेला तेच कळलं नाही. आणि खूप दिवसांनी मित्रासोबत असा एखादा खेळ मी खेळत होतो. आपल्या मित्रांसोबत धमाल करायची असेल, आणि जिभेलाही काही तरी नवं चाखायला द्यायचं असेल, तर या ज्यूस बारचा विचार करायला तुम्हाला हरकत नाही.

झेंगा खेळ रंगत आलेला आणि एका मागोमाग एक पदार्थ टेबलवर येऊ लागले. मग खेळ बाजूला करू सगळं लक्ष खाण्याकडे केंद्रित केलं. समोर आलेल्या चिकन टिक्का सँडविचचा घास घेतला. हे थोडं तिखट सँडविच आहे पण तुम्हाला आवडेल, हे मात्र नक्की. फ़्राईज हा तुमचा विक पॉइंट तर तुम्ही इथे नक्की यायला हवं. या वेळी मी क्रीम अँड ओनियन फ़्राईज मागवलेले. तुम्हीही ते नक्की चाखून बघा. चिबूड, अननस आणि कलिंगड या फळांचा रस एकत्र करून बनवलेलं ‘अप द आल्पस’ हे ज्यूसही तुम्हाला आवडेल. कॉफीच्या आवडत असेल तर आयरिश क्रीम कॉफी शेकला तुम्ही नक्की पसंती द्याल. तर या मेजवानीमध्ये मला सगळ्यात जास्त ब्रावनी नटेला शेक सर्वात जास्त आवडला. त्यामुळे या परिसरात पुन्हा जाणं झालं तर मी नक्की ते विकत घ्यायला विसरणार नाही. शिवाय पुढच्या वेळी इथे आल्यावर काय खायचं याचीही आम्ही लिस्ट बनवली आणि पाऊस थांबलाय हे बघून आम्ही घराकडे निघालो.


आज मी भेट दिली ठाण्याच्या हिरानंदानी मेडोज मध्ये असलेल्या ‘ड्रंकन मंकी’ या रेस्टॉरंटला. पण, हा प्रवास काही इथेच संपलेला नाही. इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.
खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.

कुठे ?

साधारण खर्च ?

दोन माणसांसाठी साधारण ४०० रुपये

काय खावं ? 

कोणताही ज्यूस किंवा शेक