थंडी आता बऱ्यापैकी सुरू झाली आहे. अशा वेळी मित्रांना घेऊन टपरीवरचा चहा आपला हक्काचाच, पण, आपल्या एखाद्या मित्राकडून ट्रीट मिळायची बाकी असेल तर त्यासाठी एक उत्तम पर्याय मी शोधला आहे. तो म्हणजे ठाण्याचं बॉम्बे डिलाईट हे नव्याने सुरू झालेलं इटालियन रेस्टॉरंट. इथले वेगवेगळे पदार्थ तुम्ही नक्कीच चाखून बघायला हवेत.

वेगवेगळे इटालियन पदार्थ एकाच ठिकाणी चाखून बघायचे असतील तर ठाण्याच्या ‘बॉम्बे डिलाईट’चा विचार करायला काहीच हरकत नाही. दिवाळी संपली आणि फराळ संपवायच्या घाईमध्ये असलेल्या मित्रांना काही तरी वेगळं चाखण्याची इच्छा होती. त्याच वेळी ठाण्यात हे नवं रेस्टॉरंट सुरू झाल्याचं कळलं. तेव्हा आमची स्वारी या रेस्टॉरंटच्या दिशेने निघाली.

इटालियन पदार्थ हे आपल्यासाठी काही नवे नव्हेत. पिझ्झा, बर्गर, पास्ता सारखे अनेक पदार्थ आपण नेहमी खातो. पण, ठरलेल्या त्याच त्या रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा मी ठाण्याच्या ‘बॉम्बे डिलाईट’मध्ये पोचलो. रेस्टॉरंट तसं नुकतंच सुरू झालेलं. पण, इथला मेनू काही संपेनाच. तुम्हाला हव्या असलेल्या एखाद्या इटालियन पदार्थाचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला इथे चाखता येतील.

बॉम्बे डिलाईटच्या या भेटीमध्ये आम्ही नेहमीचा पिझ्झा खाण्यापेक्षा ‘पिझ्झा सँडविच’ खाण्याचं ठरलं. पिझ्झाचा कोणताही प्रकार असो. इथला ब्रेड इथेच बनतो. पिझ्झा ब्रेडमध्ये अलगद भरलेल्या पनीर टिक्का, सेजवानच्या मिश्रणाने हे ‘पिझ्झा सँडविच’ आमच्या सर्वांच्याच आवडीचं ठरलं. पिझ्झा ब्रेड नको असेल तर हेच मिश्रण भरलेलं ‘पनीर टिक्का व्रॅप’ खायला सुद्धा हरकत नाही. फ्राईज हा माझा आवडता प्रकार. त्यातही पिझ्झा फ्राईज म्हणजे बेस्ट पर्याय. मला आवडलेल्या फ्राईज पैकी या सगळ्यात उत्तम फ्राईज या असतील.

बर्गर हा तुमच्या आवडीचा पदार्थ असेल आणि नेहमीच्या त्याच त्या बर्गरला कंटाळला असाल, तर इथले नवे पर्याय तुम्ही चाखून पाहा. या भेटीमध्ये मी थोडं तिखट सेजवान बर्गर आणि भरगच्च भरलेलं महाराजा बर्गर खाल्लं. बर्गरच्या चाहत्यांनी हे नक्की चाखावेत.

पास्ताचे वेगवेगळे प्रकार समोर मेनूमध्ये पाहत होतो, तेव्हा नेमकं काय खावं हा प्रश्न होताच. तेव्हा ‘अल्फ्रेडो पास्ता’ खाण्याचं आम्हाला शेफने सुचवलं. सोबत नेहमीचा आवडीचा गार्लिक ब्रेड सुद्धा आम्ही मागवला. हे उत्तम समीकरण तुम्हीही नक्की चाखून पाहावं. या वेळी आम्ही ‘वॅफल’ सुद्धा खाल्ले. नटेला चॉकलेट लावलेले, वरून किसलेलं चॉकलेट, जेम्सच्या गोळ्या आणि सोबत चॉकलेट आईसक्रिम म्हणजे आत्ता पर्यंत खाल्लेलं ‘बेस्ट वॅफल’.

मॉकटेल ड्रिंक्समध्ये मोहितोचे वेगवेगळे प्रकार इथे उपलब्ध आहेत. नेहमीचा वर्जिन मोहितो किंवा लवली मोहितो तुम्हाला नक्कीच आवडेल. फ्रुट ज्यूस आणि स्मूदीचे वेगवेगळे प्रकारही इथे उपलब्ध आहेत. यातला माझा सर्वात आवडता प्रकार म्हणजे बेरी ब्लास्ट. या खास या स्मूदीची चव चाखण्यासाठी तुम्ही या रेस्टॉरंटला भेट द्यायलाच हवी. शिवाय फ्रुट पंच किंवा तुमच्या आवडत्या एखाद्या फळाचा ज्यूस प्यायचा असेल तर तो सुद्धा इथे उपलब्ध आहे.

मिल्कशेकचे वेगवेगळे प्रकार सुद्धा नक्की चाखावे असेच आहेत. या भेटीमध्ये आम्ही ओरिओ मिल्कशेक आणि कीटकॅट मिल्कशेक चाखून पाहिले. तुमच्या आवडत्या चॉकलेट फ्लेवरचा मिल्कशेक तुम्हाला इथे नक्कीच मिळेल. त्यासाठी तुम्ही एकदा तरी या नव्या इटालियन रेस्टॉरंटला भेट द्या.

ठाण्यात इटालियन पदार्थांची मेजवानी चाखायची असेल तर या रेस्टॉरंटला नक्कीच भेट द्या. जाताना सोबत आपल्या मित्रांनाही घेऊन जा. आज मी भेट दिली ठाण्याच्या बॉम्बे डिलाईट या रेस्टॉरंटला. पण, हा प्रवास काही इथेच संपलेला नाही. इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.

खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.