एखाद्याच्या मनात जागा निर्माण करायची असेल, तर तिथे पोचण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग हा पोटातून जातो. माझ्या समोर चार खमंग पदार्थ बनवून ठेवले तरी माझं मन जिंकणं सहज शक्य आहे. मुंबई-महाराष्ट्रात एक असाही समाज राहतो, ज्याने माझं मन कधीच जिंकलं आहे. यांच्या घराच्या बाजूने जाताना प्रत्येक वेळी एक छान सुगंध नाकाशी येतो. आणि आज याच्या घरात नेमकं काय बनत असेल, याचं कुतूहल मला नेहमी असतं. तो म्हणजे बोहरा समाज. आज नाक्या नाक्याला बिर्याणी, तंदुरी मिळते, पण जेव्हा संधी मिळेल तेव्हा अस्सल बोहरी मेजवानी चाखायची, हे केव्हाच मनाशी मी पक्कं केलेलं. आज, हॉटेल कोहिनूरच्या सॉलीटेअर रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या बोहरी फूड फेस्टिवलच्या निमित्ताने ही मेजवानी चाखण्याची संधी मला मिळाली.

बोहरी पदार्थ चाखायला मिळणार या आनंदातच मी कोहिनूर हॉटेलच्या दिशेने प्रवास सुरू केला. वाटेत दिसणाऱ्या तंदुरी आणि बिर्याणीच्या गाड्या इतर वेळी मला आकर्षून घेत, पण आज अस्सल बोहरी मेजवानी माझी वाट पाहत होती. सॉलीटेअर रेस्टॉरंटमध्ये शिरताच तो सुगंध पुन्हा एकदा माझ्या नाकाशी येऊन पोचला, आणि या वेळी मी ती मेजवानी चाखण्यासाठी सज्ज होतो. दही पुरी आणि चाट खात मी बोहरी समाज आणि त्यांच्या खाद्यसंस्कृती बद्दल थोडं जाणून घेतलं. आज या मेजवानीमध्ये काय काय खायला मिळणार हे शेफ अब्दुल रौफ स्वतः सांगत होते आणि माझं सगळं लक्ष कधी गप्पा संपत आहेत, याकडे होतं. कारण समोरची मेजवानी माझी वाट पाहत होती.

बोहरी फूड फेस्टिवलमधली मेजवानी

बोहरी खाद्यसंस्कृतीमध्ये जेवणापूर्वी मीठ चाखतात. जीभ स्वच्छ व्हावी, सर्व वास, चव निघून जावी, आणि आपण पुन्हा नव्या मेजवानी सज्ज व्हावं, यासाठी ही परंपरा बोहरी घराघरांत युगानुयुगे सुरू आहे. मीठ चाखून थोडा भात जिभेवर ठेवावा, जेणेकरून मिठाचा खारटपणा निघून जातो, आणि तुम्ही खऱ्या अर्थाने बोहरी पद्धतीचे पदार्थ चाखण्यासाठी सज्ज होतात. मेजवानीची सुरुवात वेगवेगळे कबाब चिकन आणि मटन कबाब यांनी होते. पुढे मटन कटलेट खात तुम्ही कितीतरी वेळ थांबतात. कबाब हा पदार्थ खरं तर तुम्ही कितीही खा. पोट नक्कीच भरेल, पण मन ? त्याचं काय ? ते कधीच भरत नाही. पण, पुढची मेजवानी सुद्धा चाखायची आहे, तेव्हा तुम्ही ‘आता कबाब पुरे’ असं मनावर दगड ठेऊन म्हणतात आणि मेन कोर्सकडे वळतात. मग वार कोणताही असो आज तुम्हाला अस्सल बोहरी पद्धतीचे मांसाहारी पदार्थ चाखायला मिळणार म्हटल्यावर तुमच्या मनात दुसरा कोणताही विचार येत नाही.

बोहरी फूड फेस्टिवल मधला खिमा पाव

बोहरी खाद्य संस्कृतीमधला माझा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे खिमा पाव. खिमा पाव आवडत नाही असा एखादा सापडणं जरा कठीणच. कॉलेजच्या दिवसांत आम्ही येऊन जाऊन खिमा पाव खायचो. त्या आठवणी आणि समोर असलेला खिमा चघळत मी वेगवेगळ्या पदार्थांवर नजर टाकली. इतर वेळी खिचडा तुम्ही खाल की नाही, देव जाणे, पण इथला तुपात बनवलेला खिचडा तुम्हाला नक्की आवडेल. आपण इतर वेळी खातो तो दाल चावल आणि बोहरी घरात बनतो तो दाल चावल यातही फरक असतो. भात आणि त्यावर थर लावून वाफेवर शिजवलेली डाळ म्हणजे यांचा दाल चावल. सोबत ऑल टाईम फेव्हरेट दाल मखनी. सोबत चवीला बोहरी पद्धतीचं वांग्याचं भरतं. त्यामुळे श्रावण असलेल्यांनाही हा जिभेला पाणी सुटेल असा मेनू चाखण्यासाठी इथे यायला हरकत नाही.

हाच तो लेग पीस

खिमा पाव खाऊन झाल्यावर बोहरी पद्धतीचं मटन, रोटी आणि बिर्याणी घेऊन मी जेवायचा बेत केला. हे सगळं घेऊन मी खाण्यासाठी बसणार इतक्यात माझं लक्ष तंदुरी चिकनकडे गेलं. आणि पावलंही आपोआप त्या दिशेने वळली. समोर शिजलेल्या आख्ख्या कोंबडीचे लेग पीस घेऊन मी माझ्या जागेवर येऊन बसलो. अतिशय उत्तम शिजलेले तंदुरीचे लेग पीस अवघ्या काही मिनिटांत फस्त झाले. तुमचीही काही वेगळी गत नसेल, यात शंका नाही. आणि मग आरामात बिर्याणी आणि मटन खात गप्पा रंगल्या.

इतकं सगळं खाऊन पोट अगदी काठोकाठ भरलेलं. पण, फिरनी, शीर खुरमा, आदी गोड पदार्थ अजून बाकी होतेच. ते चाखून आम्ही बोहरी मेजवानीची शेवट बोहरी पद्धतीने मीठ चाखून केली. आणि शेफ अब्दुल रौफ यांचे आभार मानून घरी रवाना झालो. अस्सल बोहरी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यायचा असेल, तर हॉटेल कोहिनूर कॉन्टीनेंटलच्या सॉलीटेअर रेस्टॉरंटमध्ये जाण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही.

तुम्हालाही या फूड फेस्टिवलमध्ये जाऊन बोहरी मेजवानीचा आस्वाद घ्यायचा असेल, तर आजच हॉटेल कोहिनूर कॉन्टीनेंटलच्या सॉलीटेअर रेस्टॉरंटला भेट द्या. ही मेजवानी तुम्हाला केवळ २ सप्टेंबर २०१८ पर्यंतच चाखता येईल.

आज मी भेट दिली हॉटेल कोहिनूर कॉन्टीनेंटलच्या सॉलीटेअर रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या बोहरी फूड फेस्टीव्हलला. पण, हा प्रवास काही इथेच संपलेला नाही. इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.

खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.