अकरावीत असताना एका बंगाली मुलीशी कॉलेजमध्ये ओळख झाली. मराठीचा ‘म’ सुद्धा न कळणाऱ्या या मुलीने मला मराठी शिकवशील का ? असं विचारलं. तेव्हा त्या बदल्यात मला टेस्टी ‘बंगाली मेजवानी’ चाखायला मिळेल का? असं मी सहज विचारलं. आता तिला मराठी बऱ्यापैकी कळतं, मोडकं तोडकं का होईना बोलता पण येतं. पण, प्रत्येक वेळी आम्ही भेटलो की मी तिला ‘बंगाली मेजवानी’ची आठवण करून देतो. आणि ‘ये कधी तरी जेवायला, नक्की बनवून खायला घालेन’ असं सांगून ती मोकळी होते. रसगुल्ला हा एक पदार्थ सोडला तर बंगाली पदार्थांच्या यादीतलं एखादं नावही मला माहीत नव्हतं. पण, कधी तरी ही मेजवानी चाखायला मिळेल, या स्वप्नांवरच आयुष्य पुढे चाललं होतं. कारण, हा ‘बंगाली मेजवानी’चा हा योग आज तोवर तरी माझ्या नशिबात आला नव्हता. पण, अचानक फोन वाजला आणि मी रवाना झालो हॉटेल कोहिनूर कॉन्टीनेंटलच्या दिशेने. कित्येक वर्षांपासूनची ‘बंगाली मेजवानी’ चाखण्याची इच्छा आज पूर्ण होणार होती. हॉटेल कोहिनूर कॉन्टीनेंटलच्या सॉलीटेअर रेस्टॉरंटमध्ये भरलेल्या बंगाली फूड फेस्टिवलच्या निमित्ताने.

मुंबईच्या तुडुंब भरलेल्या लोकल ट्रेन मधून आणि धो धो पडणाऱ्या पावसातून वाट काढत मी सॉलीटेअर रेस्टॉरंटच्या दारात पोचलो. तेव्हा ओवाळणीने माझं स्वागत झालं. आत शिरताच बंगाली पदार्थांचा छान सुगंध माझ्या नाकाशी येऊन पोचला आणि आणखी एक स्वप्न आज पूर्ण होणार या आनंदात मी माझ्या जागेवर जाऊन बसलो. कानावर पडणाऱ्या बंगाली संगीतापेक्षा समोर तयार होणाऱ्या बंगाली भेळेकडे जास्त लक्ष होतं. जेव्हा या भेळीचा पहिला घास खाल्ला तेव्हा खरं तर बंगालमध्ये जाऊन पोचल्याचा भास झाला. अस्सल बंगाली मसाले, आंबट गोड चटणी, कुरमुरे, खोबरं, आदी पदार्थ घालून बनलेली ही भेळ मला इतकी आवडली की या भेळेच्या अगदी दोन प्लेट मी एकट्यानेच फस्त केल्या.

पण, माझ्याकडे भलं मोठं पोट आहे. एखाद्या हॉटेलमध्ये फूड रिव्ह्यूसाठी बोलावलं तर ते नेहमीच कामी पडतं. भेळ खाऊन तृप्त झालेलो मी पुढे चना चाट आणि पाणी पुरीच्या काऊंटरला जाऊन पोचलो. इथल्या बेगुन भाजा म्हणजेच पाणी पुरीमध्ये नेहमीचा रगडा नसतो, तर बटाटा आणि चणे टाकून तयार केलेलं मिश्रण असतं. तेव्हा ते पाहून हे खाऊ की नको? असा प्रश्न एक क्षण मनात डोकावून गेला. आणि हिम्मत करत मी पहिली पुरी स्वाहा केली. आणि पुढच्या १०-१२ सुद्धा.

पाणी पुरी खाता खाता बाजूच्या बेगली रोल काऊंटरकडे लक्ष गेलं. मग, स्वारी तिथे निघाली. पोळीमध्ये बंगाली पद्धतीचं मिश्रण आणि चटण्या घालून केलेला हा रोल संपायला मिनिटभरही पुरेसा होता. तुमच्या खाण्याच्या सवयीनुसार व्हेज-नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे रोल इथे तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. मी मात्र दोन्हींची चव चाखली. हे रोल तुम्हाला आवडतील याची खात्री माझी.

इथपर्यंतचा खाद्य प्रवास थोडा सोपा आणि लज्जतदार होता. पण, लक्ष मेन कोर्सकडे गेलं आणि कोड्यात पडायला झालं. बंगाली पदार्थांची नाव वाचून यात नेमकं काय आहे ? काय काय खावं काही कळेना. शेवटी या फेस्टिवलच्या सर्वेसर्वा मास्टरशेफ सुनेत्रा स्वत: माझ्या मदतीला धावून आल्या. लक्ष प्लेट भरण्याकडे असल्याने पदार्थांची नाव काही माझ्या लक्षात राहिली नाहीत, पण कशा सोबत काय खावं, कोणता पदार्थ कसा बनवला, त्यात काय काय आहे, हे मास्टरशेफ सुनेत्रा मला आवडीने सांगत होत्या, त्यांच्या मदतीनेच मी माझी प्लेट भरली आणि जेवण्यासाठी सज्ज झालो.

जेवणात अस्सल ग्रामीण बंगाली पद्धतीचं शुकतो, आलू फुलकोबी, चिंगरी मलाई करी, कोशा मंगशो, माशेर मलाई करी, पाबदा माशेर झाल, रुई माशेर कालिया, रोहू फिश मसाला, पोस्तो मुर्गी, धोकर दालना, आलू पोस्तो, मिश्टी पुलाव, व्हेज चॉप, छोलार दाल, भात, भाजा बेगूनी, खिमा गुगनी असे शाकाहारी मांसाहारी पदार्थ उपलब्ध आहेत. पण, ही मेजवानी इथेच संपत नाही, तर जेवल्यावर गोड म्हणून चित्रकुट, संदेश, पतिषपता, चीज जिलेबी, मिष्टी दोई, रसगुल्ला असे गोड पदार्थही देण्यात आले आहेत.

हे सगळं खाल्ल्यावर तुमचं पोट गच्च भरेल, यात काही शंका नाही, पण जेवण पचलं पाहिजे याची सुद्धा काळजी या फेस्टिवलमध्ये घेण्यात आली आहे. जेवणानंतर लिंबू पाणी, कैरी पन्हे सुद्धा देण्यात येतं. एकंदर परिपूर्ण बंगाली जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर हॉटेल कोहिनूर कॉन्टीनेंटलच्या सॉलीटेअर रेस्टॉरंटमध्ये जाण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही.

तुम्हालाही या फूड फेस्टिवलमध्ये जाऊन बंगाली मेजवानीचा आस्वाद घ्यायचा असेल, तर आजच हॉटेल कोहिनूर कॉन्टीनेंटलच्या सॉलीटेअर रेस्टॉरंटला भेट द्या. ही मेजवानी तुम्हाला केवळ १७ जून २०१८ पर्यंतच चाखता येईल.

आज मी भेट दिली हॉटेल कोहिनूर कॉन्टीनेंटलच्या सॉलीटेअर रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या बंगाली फूड फेस्टीव्हलला. पण, हा प्रवास काही इथेच संपलेला नाही. इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.

खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.

कुठे?