दोन वर्षांपूर्वीची गोष्ट.
मी, नॅनो आणि इतर मंडळी चहा पीत होतो. माफ करा. मी नाही. नॅनो आणि इतर मंडळी चहा पीत होती. तिचा चहावर फार जीव. तर तिथे बसल्या बसल्या यंदाच्या ३१ डिसेंबरला काय करायचं यावर चर्चा सुरू होती. ‘आपण पार्टी करायची का?’ हे सगळेच बोलत होते. ‘आपण काही तरी वेगळं करूया’ असं डोक्यात आलं आणि मी ते बोलून दाखवलं. ‘पण, म्हणजे काय?’ हा समोरून आलेला प्रश्न. ‘लोकं धमाल करायला गेटवे जातात. पण पोलीस मात्र त्यांचं कर्तव्य बजावत असतात. त्यांच्यासाठी काही केलं तर?’ नॅनो म्हणाली. माझं लक्ष तिच्या चहाकडे गेलं. नॅनो सारखंच अनेकांसाठी चहा हा जीवनातला अविभाज्य घटकच. आजूबाजूची परिस्थिती काहीही असो, त्यांच्यासाठी चहा म्हणजे सुख. ‘आपण त्यांना चहा दिला तर’ माझ्या तोंडून आपसूक निघून गेलं. पण त्याचं श्रेय नॅनोच, कारण तिला बघूनच हे सुचलं.

ठरलं तर. गेटवेला ड्युटीला असणाऱ्या सगळ्यांना चहा द्यायचा. तितकंच काय ते त्यांना मिळालेलं सुख. दोन मिनिटांचा कामातून मिळालेला निवांतपणा. कामाचा ताण कमी करण्याचं हे टोनिक आम्ही त्या दिवशी पोलीस काकांना देणार होतो. नॅनोने या मोहिमेसाठी मित्रांना जमवायला, लागणाऱ्या सामानासाठी पैसे जमवायला सुरुवात केली. त्या दिवशी लागणारा चहा आणि इतर गोष्टींची सोय मी करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आलं ‘गेटवेला लोकांच्या सुरक्षेसाठी ७०० पोलीस सज्ज’ आमचं बजेटही आम्ही वाढवलं. आणखी मित्रांना बोलावून घेतलं. पण १२ वाजता ७०० चहा कोण बनवून देणार? त्यासाठी इतक्या किटल्या कुठून आणायच्या? हे प्रश्न समोर होतेच.

अशा वेळी आम्ही काम करत असलेल्या टाइम्सच्या कँटीनने मदत केली. नवा दिवस उजाडायच्या आत किटल्या पुन्हा ऑफिसमध्ये आल्या पाहिजेत, या एका अटीवर त्यांनी आम्हाला दहा किटल्या दिल्या. सोबत कमी दारात चहा सुद्धा. आम्ही अर्ध्या किटल्या घेऊन ११:३० वाजताच गेटवेला पोचलो. तर उरलेल्या किटल्या मरीन ड्राईव्हला गेल्या. जग नवीन वर्षाचं स्वागत करत होतं. पण, ज्यांना आज सुट्टी नाही, खरं तर प्रत्येक वेळी आपण सण साजरा करत असतो आणि ते काम करत असतात, अशा पोलिसांना आम्ही भेटत होतो. त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना चहा देत होतो.

अनेकांच्या चेहऱ्यावर तो चहा पिताना एक वेगळंच सुख दिसत होतं. ‘कुठून आलास? काय करतोस? किती शिकलास?’ असं आपुलकीने ते विचारात होते. खरं तर लहान असताना ‘पोलीस काका आले बघ’ असं म्हटल्यावर भीती वाटायची. पण, तेच पोलीस काका आपुलकीने आपल्याला आज हे प्रश्न विचारातील असं कधी वाटलं नव्हतं. ती सारी किमया त्या चहाची.

दोन दिवसांपूर्वी नॅनोचा फोन आला. ‘लक्षात आहे ना, ३१ डिसेंबर जवळ येतंय.’ पण, विसरण्याचं काही कारणच नव्हतं. पुन्हा एकदा ‘अ कप ऑफ स्माईल’ हाती घेऊन आम्ही त्या प्रत्येक पोलीस काकांना भेटायला जाणार आहोत.

यंदा फक्त गेट वेच नाही, तर आणखी काही नव्या जागा निवडत आहोत. नवे मित्र सोबत घेत आहोत. आणि हातात चहाचे कप घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. तर तुम्हीही येताय ना ‘कप ऑफ स्माईल’ मोहिमेत सहभागी व्हायला?

तुम्ही काय करू शकता?

० आम्हाला स्वयंसेवकांची गरज आहेच. जितके जास्त हात मदतीला असतील, तितकी ही मोहीम मोठी होऊ शकते. जास्तीत जास्त पोलीस काकांपर्यंत आम्ही पोचू शकतो.

० हे सगळं करण्यासाठी दर वर्षी प्रमाणे यंदाही एक मोठी रक्कम उभी करायची आहे. त्यामुळे तुम्ही शक्य तितके पैसे देऊन मदत करू शकता.

० ही मोहीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं आणि त्यांनी त्यात सहभागी होणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे या मोहिमेबद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सांगू शकतात.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरा. मोहिमेबद्दल अधिक माहिती तुम्हाला पुरवण्यात येईल.