नमस्कार, मी दीपेश, दीपेश मोहन वेदक. मोबाइल, कम्प्युटर किंवा कुठूनही तुम्ही ही पोस्ट वाचत असाल, मी आज तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट. हो, माझी गोष्ट. खरं सांगायचं तर मी हा ब्लॉग का सुरू करतोय याची गोष्ट. तुम्ही हे वाचत आहात, म्हणजे तुम्ही सुद्धा मा‍झ्या या भटकंतीचं एक कारण आहात. पहिलं, दुसरं, कितवं कारणं ? ते मी तुम्हाला आत्ता सांगत नाही. पण, काळजी करू नका, तुम्ही हे वाचत आहात म्हणजे तुम्ही सुद्धा या भटकंतीचा एक भाग आहात. हा लेख वाचताना तुमचाही उल्लेख यात येईलच.

इथले नियम सोप्पे आहेत. खरं तर दोनच आहेत. पहिला नियम, तुम्ही वाचायचं आहे. दुसरा नियम, तुम्हाला आवडलं तर तुमच्या मित्रांना हे शेअर करायचं आहे. बोललो होतो ना, नियम सोप्पे आहेत. जमेल तुम्हाला. पण, हे करायचंच असं काही बंधन नाही.

लहानपणी आई प्रत्येक विकेंडला मामाकडे घेऊन जायची. कदाचित मी केलेला तो पहिला मोठा प्रवास. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या तेव्हा मी एक काम करायचो. ठाणे ते बदलापूरमध्ये कोण कोणती स्टेशन्स येतात? किती स्टेशन्स येतात? ते बघत बसायचो. सेन्ट्रल लाईनवर येणारी ही सगळी स्टेशनं वयाच्या तिसऱ्या चवथ्या वर्षी मला पाठ होती. पण, शनिवार रविवार घरी बसण्यासाठी नाही, बाहेर फिरण्यासाठी आहे, हे मला मा‍झ्या आईने तेव्हा नकळत शिकवलं. मा‍झ्या या भटकंतीचं हे पहिलं कारण. मी आजही शनिवार रविवार घरी बसू शकत नाही, कुठे तरी मला फिरायला जायचं असतंच. बाबांनीही मला त्यासाठी कधी अडवलं नाही.

मी चार वर्षाचा असताना आई गेली. मी मा‍झ्या एका काकीकडे दिवसभर राहायला लागलो. संध्याकाळी बाबा आले की ते मला घेऊन जायचे. माझ्यासाठी ते कधीच पाळणाघर नव्हतं, ते माझं दुसरं घर होतं. काकीने मला बाजारहाट शिकवला. घरातलं काही सामान घ्यायचं असेल, तर काकी दुकानात जाताना मला घेऊन जायची. अनेकदा मला एकट्याला पाठवायची. आणि मी साधी कोथिंबीर आणायला गेलो तरी पूर्ण बाजार फिरून यायचो. बाजारात दिसणारी प्रत्येक व्यक्ति मला वेगळी वाटायची. त्यांच्याकडे बघत, त्यांच्या हालचाली टिपत, त्यांचे संवाद ऐकत माझी स्वारी घरी यायची. घराबाहेर पडून एकटं फिरणं. मी तेव्हा शिकलो. हे माझ्या भटकंतीचं दुसरं कारण.

मी पाचवीत होतो. तेव्हा बाबांनी मला माझ्या आत्याकडे राहायला पाठवलं. बोरीवलीला. नवीन शहर, नवीन शाळा, नवीन मित्र, सारं काही नवीन होतं. पण, तिथली एक गोष्ट अशी होती, ज्यामुळे आपण इथेच राहायचं असं मी मनात ठरवलं, जी मला आजही आवडते आणि मी त्यासाठी बोरीवलीला कधीही जाऊ शकतो. ती गोष्ट म्हणजे मा‍झ्या आत्याच्या हातचं जेवण. मा‍झ्या आत्याने बनवलेल्या जेवणाची चव जगात कुठेही शोधून सापडणार नाही. चमचमीत पदार्थ खायची सवय मला तिनेच लावली. आजही वेगवेगळे पदार्थ चाखण्यासाठी मी इथे तिथे भटकत असतो. हे मा‍झ्या भटकंतीचं तिसरं कारण.

लहानपणी आमची आजी आम्हां लहान मुलांना गोष्ट सांगायची. तुम्ही ऐकलेल्या गोष्टी परी राण्यांच्या, राजा महाराजांच्या शूरता सांगणार्‍या, वगैरे असतील कदाचित. पण, मा‍झ्या आजीची गोष्ट अगदी वेगळी असायची. तिने ती स्वत: बनवलेली असायची. पोट धरून हसवणारी, थोडी चावट, पण, आजही लक्षात राहील अशीच. पण, हा गोष्ट सांगण्याचा वारसा पुढे माझा काका, माझे बाबा, मा‍झ्या दोन्ही आत्या पुढे चालवत आहेत. एखादा प्रसंग इतका छान कोणी सांगूच शकत नाहीत. एकमेकांना आपला अनुभव सांगणं, त्यांना पोट धरून हसवणं हे त्यांच्याकडून पुढे माझ्याकडे आलं. मीही हा वारसा पुढे चालवायचं ठरवलं. तुम्हाला माझी गोष्ट सांगायचं ठरवलं, माझ्या भटकंतीची गोष्ट सांगण्याचं ठरवलं. त्यासाठी मला फिरायला तर हवंच. माझ्या भटकंतीचं हे चवथं कारण.

शाळेत असताना कधी निबंधाची वही सुद्धा पूर्ण केली नाही. पण, पेपरमध्ये स्वतःचं नाव येणं कोणाला आवडणार नाही. त्या वेळी महाराष्ट्र टाइम्समध्ये हाफ पिरीयड म्हणून एक पान यायचं. त्यासाठी एक कविता लिहिली. आणि ती छापूनही आली. मग लिहायचं ठरवलं. आणि एकापाठोपाठ पाच कविता छापून आल्या. पण, पुढे काय? लिहिणं म्हणजे केवळ कविता करणं नाही. त्यामुळे कॉलेजमध्ये गेल्यावर महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून लिहायचं ठरलं. आणि बातम्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं सुरू झालं. पण, घरी येणाऱ्या या पेपरमध्ये साडे सातशे पेक्षा जास्त वेळा नाव आलं. तरी बातम्या लिहिणं चालूच होतं. पण, आता काही तरी वेगळं लिहायला हवं,  कदाचित आपली भटकंती शब्द रुपात मांडता आली तर? असं वाटायला लागलं. आणि सुरू असलेल्या भटकंतीला वेग आला. माझ्या या भटकंतीचं हे पाचवं कारण.

महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करताना माझ्या लिखाणाला वळण लागलं. पण, माझ्या लिखाणाचा विषय भटकंती हा सुद्धा असू शकतो, हे सुद्धा तिथेच कळलं. पेपरमध्ये छापून येणारे वेगवेगळ्या लोकांनी दिलेले प्रवासाचे अनुभव वाचायला मला आवडू लागलं. त्यांनी दिलेल्या टिप्स मी सुद्धा वापरू लागलो. पण, आपल्यालाही आपली भटकंती इतरांपर्यंत पोचवता आली तर, त्यांना घर बसल्या त्यांनी न पाहीलेल्या एखाद्या ठिकाणाची सफर घडवता आली तर, हे प्रश्न मनात येऊ लागले. आणि अचानक ही वेबसाईट सुरू करण्याचं ठरलं. आज ही वेबसाईट पूर्ण झाली आहे. आणि तुम्ही हे वाचत आहात. तुम्हालाही या प्रवासाला घेऊन जायचं आता ठरलं आहे. हे माझ्या भटकंतीचं सहावं कारण आहे.

हे सगळं होत असतानाचं युट्युबचा एक छोटा अभ्यासक्रम पूर्ण केला. आतापर्यंत वेगवेगळे ट्रॅव्हल शो टीव्हीवर, युट्युबवर बघत होतो. पण, हे कसे शूट होतात, त्यासाठी काय लागतं, तांत्रिक बाबी काय असतात, युट्युब चॅनल कसं सांभाळायचं आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यातून पैसे कसे कमवायचे, हे सगळं या अभ्यासक्रमात शिकायला मिळालं. युट्युबवर दिसणाऱ्या लोकांना प्रत्यक्षात भेटता आलं, त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले. आपणही हे करू शकतो, हे वाटायला लागलं. आणि आपण लिहू शकतो, पण रेकोर्ड करून दाखवू सुद्धा शकतो, हे पटलं. आता सगळं व्यवस्थित सुरू झालं तर लवकरच युट्युबवर एक ट्रॅव्हल चॅनल सुरू करतोय. हे या भटकंतीचं हे सातवं कारण.

दरम्यान नोकरी करणं हा नवा प्रकार मी सुरू केला. पण, दहा ते सहा ऑफिसला जाणं, रोज रोज तेच ते काम करणं म्हणजे काम नाही, आपण त्या चौकटीमध्ये बसत नाहीत, हे आता वाटू लागलं आहे. आपल्याला आवडेल, आपल्याला फिरायला मिळेल, चमचमीत खायला मिळेल, खूप लिहायला मिळेल, असं काही तरी आपण केलं पाहिजे. म्हणून, हा ब्लॉग लिहिण्याचं ठरलं. हातात असलेल्या वेळेत खूप फिरायचं आणि इथे लिहायचं, हे ठरलं. आणि मा‍झ्या भटकंतीला आठवं कारण मिळालं.

साधारण चप्पल सुद्धा ट्रेकमध्ये उपयोगी पडेल का? हा विचार करून नंतरच ती विकत घेणारा मी. मग, माझं काम हे वेगळं का? ते सुद्धा भटकंतीशी निगडीत असायला हवं. ज्यात मला खूप फिरायला मिळेल, नवीन माणसांना भेटता येईल, नवे पदार्थ चाखता येतील. आणि ही वेबसाईट सुरू झाल्यावर मला हे नक्की करता येईल. मा‍झ्या या भटकंतीचं हे नऊवं कारण.

दहावं आणि शेवटचं कारण. मी सुरुवातीलाच बोललो होतो. तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजे तुम्हीही या भटकंतीचं एक कारण आहात. तुमच्यापर्यंत पोचण्याचा केलेला हा माझा एक प्रयत्न आहे. दोन हजार वाचक संख्या मी माझी वेबसाईट सुरू करण्याआधीच गाठली ती तुमच्यामुळेच. तुम्ही माझ्यासोबत या प्रवासाला यायचं ठरवलंत. आणि तुम्हाला वेगवेगळ्या सफरीवर न्यायचं, हे आता मी पक्कं केलं आहे. हे फोटो आणि व्हिडियो काढताना, या प्रवासात भेटलेली त्या ठिकाणची माणसं, तिथली संस्कृती आणि बरंच काही समजून घेण्याचा माझा प्रयत्न असेल, त्यामुळे हा नेहमीचा टिपिकल ब्लॉग नसेल, हे मात्र लक्षात राहू द्यात.

आणि हो, माझे नियम तर तुम्हाला माहीत आहेतच. माझा लेख इथपर्यंत वाचून पहिला नियम पाळलात, आता दुसरा नियम. माझ्या भटकंतीची ही कारणं तुम्हाला पटली असतील, आवडली असतील, तर तुमच्या मित्रांनाही हा लेख नक्की शेअर करा.

इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.